जालना (प्रतिनिधी) : मानव कल्याणाच्या उद्देशाने स्थापन झालेली लायन्स इंटरनॅशनल ही संस्था आता ग्रामीण भागातील तळागाळातील रुग्णांपर्यंत पोहोचत आहे. गरजू रुग्णांना माफक दरात उत्कृष्ट नेत्रचिकित्सा आणि उपचार मिळवून देण्यासाठी लायन्स परिवार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन लायन्स प्रांत 3234 एच 2 चे गॅट कॉर्डिनेटर सुनील बियाणी यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ परतूर ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत दर्जेदार व अल्पदरात नेत्रसेवा पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असून, वर्षभरापूर्वी बीड येथे मातोश्री लॉयन्स नेत्रालय कार्यान्वित करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुके आणि मोठ्या बाजारपेठेच्या गावात नेत्र चिकित्सा करून बीड येथील नेत्रालयात गरजू रुग्णांची माफक दरात आणि मोफत मोतीबिंदू व तत्सम नेत्रशस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. या नेत्रालयांतर्गत बीड जिल्ह्यातील शिरसाळा (ता. परळी) येथे श्री गणेश आय केअर व्हिजन सेंटरचे उद्घाटन सुनील बियाणी यांच्याहस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परतुर येथील दृष्टी लायन्स नेत्रालयाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर खालापुरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स आय क्लब परतूरचे अध्यक्ष महेश होलानी, मातोश्री लायन्स नेत्रालय बीडचे अध्यक्ष बाळासाहेब बेद्रे, शिरसाळ्याचे सरपंच नजीरभाई शेख, श्रीकृष्ण मल्टिस्पेशालिटी डेंटल क्लिनिकचे डॉ. कृष्णा फड, जालना लायन्स फाउंडेशनचे कोषाध्यक्ष रतन बजाज आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात मनोहर खालापुरे यांनी डोळ्यांच्या विविध आजारांचे गांभीर्य स्पष्ट करत मराठवाड्यातील लायन्सच्या नेत्र सेवेचा आढावा मांडला. ते म्हणाले की, मराठवाड्यात लायन्सचे ७ ते ८ अद्ययावत हॉस्पिटल्स अविरतपणे कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या शहरांत न जाता स्थानिक पातळीवरच डोळ्यांची तपासणी व्हावी, या हेतूने शिरसाळा येथे हे व्हिजन सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे केवळ ५० रुपयांत अत्याधुनिक संगणकीय तपासणी होणार असून मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रिया बीड येथील मातोश्री लायन्स नेत्रालयात अत्यंत माफक दरात केल्या जातील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हिजन सेंटरचे ऑप्थोलॉजिस्ट गौरव शिंदे यांनी केले. शिरसाळा परिसरातील नागरिकांनी या माफक दरातील सर्वसमावेशक नेत्र तपासणी व उपचार सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.