विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणासोबतच विविध कौशल्ये आत्मसात करावीत- शिऊरकर

मत्स्योदरी तंत्रनिकेतनमध्ये नव विद्यार्थी स्वागत समारंभ व पालक मेळावा उत्साहात

Jalna Nayak    20-Aug-2026
Total Views |

विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व पालक मेळावा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
 
जालना : विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक शिक्षणासोबतच विविध कौशल्ये आत्मसात करून बदलत्या औद्योगिक क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यावा, असा सल्ला सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगरचे माजी संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांनी दिला. मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील तंत्रनिकेतनमध्ये नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व पालक मेळावा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी शिऊरकर बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. उल्हास शिऊरकर यांनी नवविद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयीन जीवनातील शैक्षणिक गुणवत्ता, कौशल्य विकास, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचे महत्त्व अधोरेखित केले.यावेळी पालकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये महाविद्यालय आणि पालक यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाविद्यालयाच्या विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांना पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
 
विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व पालक मेळावा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून परमेश्वर मस्के, उमाकांत सूर्यवंशी व अभय कपाळे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. बिरादार होते. तसेच उपप्राचार्य प्रा. आर. एल. करवंदे, तंत्रनिकेतन प्रभारी प्रा. ए. पी. दवणे व प्रथम वर्ष प्रमुख प्रा. प्रवीण भाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे नियोजन प्रा. रोहित कडोस व प्रा. पवन भाग्यवंत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच इतर व्यवस्थापन महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले. यांत्रिकी विभागप्रमुख प्रा. गोविंद बागल यांनी उपस्थितांचे आभार मानले. नवविद्यार्थी आणि पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमास विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या नव्या शैक्षणिक प्रवासाला या कार्यक्रमातून प्रेरणादायी सुरुवात मिळाली.