सुहास सदाव्रते
जालना : दहावी- बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२७ साठी ऑनलाइन परीक्षा अर्ज भरणे, अंतर्गत मूल्यमापन यासह परीक्षक आणि नियामक यांच्या कामकाजाबाबत विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांनी ११ कलमी सूचनापत्र जारी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री.साबळे यांनी शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांना विशेष सूचनापत्र जारी केले आहे. सदर सूचनापत्रात प्रात्यक्षिक, क्रीडा विषयआणि अंतर्गत मुल्यमापनाचे गुण हे मंडळाच्या विशिष्ट लिंक वर,साईटवर ऑनलाईन भरावे लागतात.
मात्र असे निदर्शनास आले आहे, की सदर कालावधीची मुदत संपण्यासाठी थोडे,काही दिवस शिल्लक राहतात तरी देखील शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांनी हे गुण ऑनलाईन भरलेले नसतात,असेही विभागीय मंडळाचे अध्यक्ष श्री. साबळे यांनी सूचनेत नमूद केले आहे.शाळा, महाविद्यालयांची ही जबाबदारी नाही का? त्यांना आपल्या शाळा -कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीची काळजी का नाही का असा सवाल उपस्थित करीत याउपरही मुदत संपल्यानंतर साधारण १५०-२०० शाळा- महाविद्यालये यांनी माहिती भरलेली नसते. काही शाळांना तर निकाल लागल्यानंतर जेव्हा मुले नापास होतात अथवा कमी गुण मिळतात तेव्हा त्यांना जाग येते. असे प्रकार यापुढे होवू दिले जाणार नाहीत, अशाही सक्त सूचनाच देण्यात आल्या आहेत.
बहुतांश शाळा- महाविद्यालयाचे विज्ञान व अन्य विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांना विद्यार्थ्यांना ३० पैकी ३० व अन्य विषयांच्या अंतर्गत मुल्यमापनासाठी २० पैकी २० गुण सर्रास खैराती सारखे वाटले जात आहे. हुशार मुलांनासुद्धा पैकीच्या पैकी व सर्वसाधारण मुलांना सुद्धा पैकीच्या पैकी गुण दिले जात आहे. त्यामुळे हुशार व सर्वसाधारण मुलांमध्ये फरक केला जात नसून हुशार मुलांवर कोठेतरी अन्याय होत असल्याचे सूचनेत अधोरेखित करण्यात आले आहे.शिवाय इतर विषयांच्या ८०-२० च्या फॉर्म्युल्यानुसार अंतर्गत २० गुणांपैकी गुणदान करतांना विद्यार्थ्यांची ७५ टक्के किमान उपस्थिती, दोन्ही टर्म मधील ०२ युनिट टेस्ट चे तपासलेले पेपर त्यामध्ये त्यांना मिळालेले गुण, सहा माही परीक्षा, सराव परीक्षा मधील तपासलेले पेपर व त्यामध्ये मुलांना मिळालेले गुण, तोंडी परीक्षांसाठी विषय निहाय प्रश्नपेढ्या तोंडी परीक्षांचे वेळापत्रक, मुलांचे उपस्थितीचे रेकॉर्डस इत्यादी सर्व बाबी बघुनच अंतर्गत मुल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्यात येईल.ज्या कायद्याने शाळेतील कर्मचाऱ्यांच्या सेवांचे नियमन होते तो "महाराष्ट्र खाजगी शाळा (सेवेच्या शर्ती) अधिनियम १९७७ आणि नियमावली १९८१ मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी अभ्यासली पाहिजे. " राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची " वैशिष्ट्ये समजावुन घेतली पाहिजे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा हा भारतातील व राज्यातील शालेय शिक्षणाची दिशा, अभ्यासक्रम, अध्यापन पध्दती आणि मुल्यमापन ठरवणारा मुख्य मार्गदर्शक दस्तावेज आहे, त्यातील बारकावे समजून घेतले पाहिजे. बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क़ अधिनियम वाचला पाहिजे व एकूणच शालेय शिक्षण विभागाकडून विविध विषयांवर निर्गमित झालेले आणि होणारे शासन निर्णय, परिपत्रके, पत्रे यांचे संकलन (विषयनिहाय) तयार केल्या पाहिजेत व त्या कार्यालयामध्ये संग्रही ठेउन वा संगणकावर फोल्डर तयार करुन आवश्यकते प्रमाणे उपयोगात आणले पाहिजे. असा सल्लाही विभागीय अध्यक्ष श्री.साबळे यांनी दिला आहे.मंडळाचा अधिनियम आणि नियमावली (महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम- १९६५ आणि नियमावली, शिक्षासूची इत्यादी अभ्यासणे गरजेचे असल्याचे सूचनापत्रात नमूद करण्यात आले आहे.
=====