मधुमेह व उच्च रक्तदाबापासून बचावासाठी संतुलित आहार व निरोगी जीवनशैली आवश्यक - डॉ. राजेश सेठिया

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ सी सी आय एल च्यावतीने आरोग्य मार्गदर्शन शिबिर संपन्न

Jalna Nayak    21-Aug-2026
Total Views |
 
मोफत मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
 
 
जालना : सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने श्री आनंदेश्वर महादेव मंदिर, दादावाडी, हनुमान घाट येथे मोफत मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थित नागरिकांची मोफत मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शक डॉ. राजेश सेठिया यांनी मधुमेह व उच्च रक्तदाबाबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन केले. संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग्य जीवनशैली आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी यामुळे या आजारांचा धोका कमी करण्यास तसेच आजार नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे फास्ट फूड, अतिप्रक्रिया केलेले पदार्थ, अतिरिक्त साखर, मीठ व अस्वास्थ्यकर चरबीचे सेवन वाढत आहे. त्यामुळे आहारात भाज्या, फळे, कडधान्ये, संपूर्ण धान्ये आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. तसेच अन्नपदार्थांची गुणवत्ता, भेसळ व सुरक्षिततेबाबत नागरिकांनी जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी केले. नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, तंबाखू व धूम्रपान टाळणे तसेच रक्तदाब व मधुमेहाची नियमित तपासणी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी जीवनशैलीत योग्य बदल करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी व्यासपीठावर पर्यावरणप्रेमी डॉ. विठ्ठल राजकर, डॉ. अमित हजारे व भानुदास दोबाले उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अमर शिंदे, नीता आयलाने, सुमेध इंगळे व आरोग्यमित्रांनी परिश्रम घेतले.