पावसाचा उघडावा, दुबार पेरणीचे कर्ज आणि डोळ्यांसमोर सुकणारे सोयाबीन; वालसावंगीच्या बळीराजावर आभाळ कोसळले!

शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, मका आणि कपाशीची पिके अक्षरशः कोमेजून चालली

Jalna Nayak    21-Aug-2026
Total Views |

खरीप हंगाम सुरु होऊन पावसाने जी दगाबाजी केली
 
 
 
विशाल अस्वार
शेतशिवार ग्राउंड रिपोर्ट.
वालसावंगी:"डोळ्यांसमोर काबाडकष्ट करून जगवलेले पीक करपून चालले साहेब, आता जगायचं कसं?" हा टाहो आहे जालना जिल्ह्यातील वालसावंगी परिसरातील हतबल शेतकऱ्याचा. खरीप हंगाम सुरु होऊन पावसाने जी दगाबाजी केली आहे, त्यामुळे येथील बळीराजा अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. पावसाळ्यातच उन्हाळ्यासारखे चोहीकडे कडक ऊन आणि कोरड्या वाऱ्यांनी थैमान घातल्याने शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, मका आणि कपाशीची पिके अक्षरशः कोमेजून चालली आहेत.
दुसऱ्यांदा पेरणीचे संकट आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर
यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरवली. पहिल्यांदा केलेली पेरणी पावसाअभावी जमिनीतच जळून गेली. बियाणे वाया गेले, खतांचा खर्च पाण्यात गेला. पण पोटाच्या खळगीसाठी आणि संसाराच्या गाड्यासाठी शेतकऱ्याने शेजारपाजाऱ्यांकडून, सोयीच्या माणसांकडून हातउसनवारी करून, प्रसंगी सोन्या-नाण्यांचे कर्ज काढून पुन्हा दुबार पेरणी केली. कसाबसा अंकुर फुटून पिकाने मूळ धरले, तोवर पावसाने अशी काही उघडीप दिली की, जणू पावसाळा संपून उन्हाळाच सुरू झाला.
पाण्याची निकड आणि वीजेचा लपंडाव
आता पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी मिळेल त्या ठिकाणाहून पैशांची जुळवाजुळव करून ठिबक आणि स्प्रिंकलरचा आधार घेतला आहे. रात्र-रात्र जागून शेतात पाणी देण्याचा अतोनात प्रयत्न सुरू आहे. मात्र, या संकटातही निसर्गासोबत वीज मंडळानेही जणू शेतकऱ्यांशी जकाती काढली आहे. दिवसा असो वा रात्री, वीज वारंवार गुल होत असल्याने स्प्रिंकलर यंत्रणा बंद पडतात. विहिरींची भूजल पातळी आधीच खोलवर गेल्याने मोटारी पाणीफेक करेनाशा झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास असा डोळ्यांसमोर हिरावून जात असताना बळीराजाचा हिय्या सुटत चालला आहे.
कुटुंबाचा गाडा कसा चालणार?
"गेल्या वर्षीचे अद्याप उसनवार फेडायचे बाकी आहे, त्यात यावर्षी दुबार पेरणी आणि आता पिकाला जीवदान देण्यासाठी पुन्हा हजारो रुपयांची उधळपट्टी करावी लागली. पण आता पाणीच मिळेनासे झाल्यामुळे पीक वाचण्याची कोणतीही आशा उरलेली नाही," असे म्हणताना वालसावंगी परिसरातील एका वृद्ध शेतकऱ्याच्या डोळ्यातून अनावर झालेले अश्रू साऱ्या व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगतात.
दुबार पेरणीचे संकट, वाढलेला खर्च, विहिरींची कोरडी पडलेली पोट आणि डोळ्यांसमोर जळून खाक होणारे सोयाबीन,मका पिकाचे मळे पाहून, वालसावंगीचा शेतकरी आज खऱ्या अर्थाने हतबल झाला आहे. शासनाने तातडीने या दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व दिलासा द्यावा, अन्यथा या परिसरातील बळीराज्यावर आत्महत्येचे सावट ओढवल्याशिवाय राहणार नाही, अशी आर्त हाक संपूर्ण वालसावंगी परिसरातून दिली जात आहे.
शेतकरी श्रीकांत आखाडे म्हणाले की वालसावंगी परिसरात पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील पिके हातची गेल्यातच जमा आहे.पिके वाचवण्याची शेवटची धडपड शेतकरी करत आहे.पण पाऊसच नसल्याने पिके जगणार तरी कशी शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देने गरजेचे आहे.