जालना- मुदतबाह्य बिस्किटांचा साठा जप्त;

दोन व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

Jalna Nayak    21-Aug-2026
Total Views |

मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला
 
जालना / प्रतिनिधी
मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यक्रमात वाटप करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांपैकी ‘क्रिस्पी अँड क्रंची स्वीट अँड सॉल्ट क्रॅकर’चे पाचपैकी एक खोके मुदतबाह्य असल्याचे आढळून आले. या प्रकरणाची दखल घेत अन्न सुरक्षा विभागाने तपासणीची कारवाई करून तब्बल १६ खोके मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित दोन व्यापाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
जालना येथील मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यक्रमासाठी कार्यक्रम व्यवस्थापक संतोष क्षीरसागर यांनी नवीन मोंढा परिसरातील मे. भाग्यश्री ट्रेडर्स यांच्याकडून ‘क्रिस्पी अँड क्रंची स्वीट अँड सॉल्ट क्रॅकर’ खरेदी केले होते. कार्यक्रमात वाटप करण्यात आलेल्या पाच खोक्यांपैकी एका खोक्यातील खाद्यपदार्थ मुदतबाह्य असल्याचे निदर्शनास आले.
यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती तांबे यांनी मे. भाग्यश्री ट्रेडर्सच्या दुकानास भेट देऊन तपासणी केली. मात्र, तेथे संबंधित खाद्यपदार्थाचा कोणताही साठा आढळून आला नाही. अधिक चौकशी केली असता भाग्यश्री ट्रेडर्सने हा साठा नवीन मोंढा, जालना येथील मे. संजरी ट्रेडिंग कंपनीकडून खरेदी केल्याचे समोर आले. त्यानुसार अन्न सुरक्षा विभागाने मे. संजरी ट्रेडिंग कंपनीची तपासणी केली असता तेथे मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा आढळून आला. या कारवाईत एकूण १६ खोके जप्त करण्यात आले असून, या साठ्याची किंमत ९ हजार ६०० रुपये आहे.

मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला 
मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री व पुरवठा केल्याप्रकरणी मे. भाग्यश्री ट्रेडर्स आणि मे. संजरी ट्रेडिंग कंपनी यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती अन्न सुरक्षा विभागाचे सहायक आयुक्त निखिल कुलकर्णी यांनी दिली.