जालना / प्रतिनिधी
जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी शासनाने आयोजित केलेल्या 'महा-वॉकॅथॉन' मध्येच सहभागी विद्यार्थी, नागरिक आणि जलप्रेमींच्या आरोग्याशी खेळ झाल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी घडला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत झालेल्या समारोप सोहळ्यात तब्बल पाच महिन्यांपूर्वी मुदत संपलेली बिस्किटे सहभागींच्या हातात देण्यात आली. अनेकांनी ती बिस्किटे खाल्ल्यानंतर पाकिटावरील अंतिम वापराची तारीख पाहून एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे जलसंधारण विभागाच्या बेफिकीर कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत असून, सरकारी कार्यक्रमांतील अन्नसुरक्षेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
शुक्रवारी सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून महा-वॉकॅथॉनला प्रारंभ झाला. शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, जलसाक्षरतेवर काम करणाऱ्या संस्था, जलदूत, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिस मैदानावर कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर उपस्थितांना पाणी आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. मात्र, बिस्किटे खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की, पाकिटावरील 'वापरण्याची अंतिम तारीख २० मार्च २०२६' अशी आहे. म्हणजेच ही बिस्किटे जवळपास पाच महिन्यांपूर्वीच मुदतबाह्य झाली होती. ही बाब वाऱ्यासारखी पसरताच मैदानावर गोंधळ उडाला. अनेक विद्यार्थ्यांनी संतापाच्या भरात बिस्किटांची पाकिटे मैदानात फेकून दिली, तर काहींनी ती कुत्र्यांना खाऊ घातली. पालक, शिक्षक आणि नागरिकांनी या प्रकाराला "सरकारी निष्काळजीपणाचा कळस" असे संबोधत तीव्र नाराजी व्यक्त केली.चहा-नाश्त्याची जबाबदारी जलसंधारण विभागाने समर्थ इव्हेंट एजन्सीकडे सोपविली होती. या एजन्सीने नवीन मोंढा परिसरातील एका दुकानातून बिस्किटे खरेदी केल्याचे समोर आले आहे. जलसंधारण विभागाकडून पाच बॉक्स बिस्किटांचे वाटप करण्यात आले असून, त्यापैकी किमान एका बॉक्समध्ये मुदतबाह्य बिस्किटे असल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेकांच्या हातात अशीच बिस्किटे गेल्याचा दावा उपस्थितांनी केला आहे.घटनेनंतर जलसंधारण विभागाने संबंधित एजन्सीच्या जिल्हा समन्वयकाकडून खुलासा मागविला आहे. दुसरीकडे, अन्न व औषध प्रशासनाने संबंधित दुकानाची तपासणी करण्यासाठी पथक रवाना केले असून, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा पुरवठा नेमका कुठून आणि कसा झाला, याचा तपास सुरू केला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त निखिल कुलकर्णी यांनी दिली.जलसंधारणाचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमातच विद्यार्थी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ झाल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. शासनाच्या कार्यक्रमात अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, मुदतबाह्य बिस्किटे कार्यक्रमापर्यंत पोहोचली कशी आणि यासाठी जबाबदार असलेल्यांवर केवळ खुलासा मागवून भागणार की कठोर कारवाई होणार, याकडे आता जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
कारवाई केली जाईल
महा वॉकेथॉनमध्ये घडलेला प्रकार निंदनीय आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत माझ्या निदर्शनास आणून दिले आहे. या प्रकारासाठी जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी
जल संधारण अधिकारी गैरहजर ?
याबाबत जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके यांना फोन केला असता त्यांनी एकदाही प्रतिसाद दिला नाही. त्यांना संदेश पाठवला असता त्यासही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, या कार्यक्रमाला ते हजर नव्हते, असेही सांगण्यात आले.