वालसावंगीत वीज पुरवठ्याचा बोजवारा; कासवगतीने सुरू असलेल्या डीपी-पोल शिफ्टिंगमुळे नागरिक त्रस्त.

गुत्तेदाराची (ठेकेदाराची) काम करण्याची पद्धत अत्यंत संथ आणि कासवगतीने असल्याने ग्रामस्थांचे हाल

Jalna Nayak    21-Aug-2026
Total Views |

वालसावंगी गावात गेल्या काही महिन्यांपासून विजेची अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली
 
 
विशाल अस्वार
​वालसावंगी :वालसावंगी गावात गेल्या काही महिन्यांपासून विजेची अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावात मुख्य सिमेंट रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. या मार्गात येणारे विद्युत खांब व रोहित्र (डीपी) इतरत्र शिफ्ट करणे,क्रॉसिंग करणे, तसेच गावठाण अंतर्गत रोहित्र बसवण्यासाठी स्ट्रक्चर तयार करणे,खांब बसवणे आणि तार ओढण्याची कामे सुरू आहेत. मात्र, या कामासाठी नियुक्त केलेल्या गुत्तेदाराची (ठेकेदाराची) काम करण्याची पद्धत अत्यंत संथ आणि कासवगतीने असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
​वास्तविक पाहता, सिमेंट रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वीच ही विद्युत यंत्रणा शिफ्ट करणे गरजेचे होते. परंतु, तसे न करता अगोदर सिमेंट रस्ता बनवण्यात आला आणि आता हे स्थलांतरित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही प्रक्रिया संथगतीने होत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूचे काही काम यंत्रांद्वारे (मशीन) करता आले नाही, कारण मार्गात विद्युत पोल आणि रोहित्र अडथळा ठरत होते. त्यामुळे हे काम नाईलाजाने मजुरांकडून करून घ्यावे लागले. मुख्य रस्त्याचे संपूर्ण काम यंत्राद्वारे होणे अपेक्षित असताना प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे हा घोळ निर्माण झाला आहे.
व्हॉट्सॲप मेसेजचाच आधार:
महावितरणच्या स्थानिक प्रशासनाकडून केवळ व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘वीज बंद राहील’ अशा स्वरूपाचे मेसेज टाकून आपली जबाबदारी झटकली जात आहे. मात्र, हे काम कधी संपणार, याबद्दल कोणतेही ठोस आश्वासन मिळत नाही. सिमेंट रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वीच तांत्रिक कामांचे नियोजन करणे अपेक्षित होते, परंतु नियोजनशून्य कारभारामुळे आज नागरिकांना वेठीस धरले जात आहे.
​वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त:
आता कुठे हे पोल व रोहित्र बाजूला स्थलांतरित करण्याचे काम सुरू झाले आहे, मात्र त्यासाठी दररोज सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीज बंदचा (शटडाऊन) परवाना घेतला जात आहे.त्यात आधीच सकाळी ५ ते ७ या वेळेत भारनियमन असते आणि त्यातच सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीज खंडित होत असल्याने व्यावसायिक आणि ग्रामस्थ पूर्णपणे कंटाळले आहेत.शिवाय या व्यतिरिक्त देखील विजेचा लपंडाव सुरुच असतो.​संबंधित विभागाने आणि ठेकेदाराने दिरंगाई न करता अतिरिक्त मनुष्यबळ लावून हे संपूर्ण स्थलांतरणाचे व इतर काम युद्धपातळीवर अवघ्या दोन-तीन दिवसांत पूर्ण करावे आणि या त्रासातून गावकऱ्यांना कायमची सुटका करून द्यावी, अशी संतप्त मागणी वालसावंगीतील नागरिक व व्यवसायिकांमधून होत आहे.