जालना : शहर विकास आराखड्यात आरक्षित करण्यात आलेल्या एसआरपीएफच्या जागेवर महानगर पालिकेने भव्य उद्यान, खेळाचे मैदान, स्विमिंग पूल व सभागृह व सुसज्ज नाट्यगृह यांची उभारणी करावी या मागणीचा नगरसेवक अश्विन भास्करराव अंबेकर हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. सदरील विकास कामे कशी उभी करता येतील ? या संदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे महापौर श्री.रवि लांडगे यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन त्यांचेही यासंदर्भात मार्गदर्शन घेतले. एसआरपीएफकडे १५० ते २०० एकर जागा आहे. मंठा चौफुली-एसआरपीएफ
पेट्रोल पंप ते सिंदखेड राजा रोड पर्यंत ही जमीन मोकळी आहे. ही जागा शहराच्या व उद्यानाच्या दृष्टीनेही अत्यंत योग्य आहे. तेथे २० एकर जागेवर भव्य उद्यान उभारण्यात यावे आणि ५ एकर जागेवर एक मोठे खेळाचे मैदान, जलतरण तलाव, एक भव्य सभागृह, नाट्यगृह यांची उभारणी नवीन जालना भागातील नागरिकांसाठी करावी. अशी मागणी नगरसेवक अश्विन अंबेकर यांनी जालना नगर महापालिकेची सर्वसाधारण सभा, आमदार अर्जुनराव खोतकर, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे. सदरील विकास कामे उभी राहिल्यास जालना शहराच्या शहराच्या वैभवात निश्चितच भरच पडणार आहे. एक तरुण नगरसेवक जालना सारख्या शहरात वरील विकास कामे उभी रहावीत यासाठी करीत असलेले प्रयत्न व पाठपुरावा पाहून पिंपरी-चिंचवड मनपाचे महापौर रवि लांडगे यांनी नगरसेवक अश्विन भास्करराव अंबेकर यांचे कौतुक केले. यावेळी युवा उद्योजक शैलेश गाढे यांची उपस्थिती होती.