वैद्यकीय व्यवस्था अन्‌‍ जालना?

जिल्ह्यातील पावणेसातशे खाजगी रुग्णालयांपैकी दोनशे अठरा खाजगी रुग्णालये अनधिकृत असून जिल्ह्यात छतीस बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचे विदारक चित्र

Jalna Nayak    22-Aug-2026
Total Views |
 
medical-system
 
जालना जिल्ह्यातील पावणेसातशे खाजगी रुग्णालयांपैकी दोनशे अठरा खाजगी रुग्णालये अनधिकृत असून
जिल्ह्यात छतीस बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. जिल्ह्यातील ही
परिस्थिती काही नव्याने निर्माण झालेली नसून गेल्या वर्षानुवर्षे कमी-अधिक प्रमाणात असले गंभीर प्रकार
उघडकीस येतात, त्यावर त्या त्यावेळी मलमपट्टी केली जाते आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी
काहीशी स्थिती कायम राहते. जालना जिल्हा हा नेहमीच बोगस डॉक्टर्स, अनधिकृत रुग्णालये, गुटखा,
गावठी कट्टे, तलवारी, वाळू चोरी, बोगस विकास कामे, अवैध व्यवसाय, मटका, जुगार अड्डे अशा विविध
कारणांनी गाजत असतो. अधूनमधून त्यातील काही घटनांचा अतिरेक झाल्यास तेवढ्यापुरती कारवाई
केल्यासारखे दाखविले जाते आणि प्रकरण गुंडाळले जाते. जालना जिल्ह्यात असलेल्या अनधिकृत खाजगी
रुग्णालयांपैकी सर्वाधिक रुग्णालये जाफराबादसारख्या अत्यंत मागासलेल्या तालुक्यात आहेत. त्या
खालोखाल भोकरदन तालुका, परतूर, जालना आणि बदनापूर तालुक्यांचा क्रमांक असल्याचे जिल्हा
परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. तपासणीअंती सर्व रुग्णालयांना
संबंधित तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत नोटिसा बजावून पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात
येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी नमूद केले असले तरी एकदा नोटिसा बजावल्या,
की बोगस डॉक्टर अचानक बेपत्ता होत असल्याचा अनुभव नेहमीचा असून अनधिकृत खाजगी रुग्णालयांवर
काय कारवाई करणार असा काहीसा प्रश्न आहे. सध्या जालना जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह जिल्हा
महिला रुग्णालय, आंबेवाडी (ता. जालना) येथील आयुर्वेद रुग्णालय महाविद्यालय, वरुडी (ता. बदनापूर)
येथील नूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, शेलगाव (ता. बदनापूर) येथील गुरु मिश्री होमिऑपेथीक
महाविद्यालय रुग्णालय अशा रूग्णांलयांसह नव्याने मंजूर होऊन सुरू झालेले जालना वैद्यकीय
महाविद्यालय रुग्णालय अशी आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. म्हणजेच जालना जिल्ह्यात सहा सहा
वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालये असून त्या व्यतिरिक्त पावणेसातशे खाजगी रुग्णालये सद्य:स्थितीत
कार्यरत आहेत. एवढी मोठी वैद्यकीय व्यावसायिक व्यवस्था असतानाही जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा
सुळसुळाट असून त्यांची पडताळणीनंतरची संख्या केवळ छत्तीस असली तरी लपून लपून व्यवसाय
करणारेही बरेच असावेत. अगदी नजरेत भरेल असे उदाहरण द्यायचे झाल्यास शहरातील मस्तगड
परिसरात एक ‘दिल्लीवाले दातवाले’ नामक दंत वैद्यकीय व्यावसायिक वर्षानुवर्षे हजारो दंतरुग्णांवर
यशस्वी उपचार करीत असल्याचा ‘जाज्वल्य’ इतिहास आहे. जालना जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेच्या
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने, जालना महानगर पालिका प्रशासन आणि त्या महापालिकेच्या
आरोग्य अधिकाऱ्यांनी किमान या दिल्लीवाल्या दातवाल्यांना भेटून त्यांच्या यशस्वी व्यवसायाबद्दल अगदी
व्यावसायिक भाषेत सांगायचे झाल्यास त्यांच्या यशस्वी ‘प्रॅक्टिस’बद्दल एखादा पुरस्कार देता आला तर
पाहावे अशी काहीशी सूचना आहे. तूर्तास...!