जालना : पावसाचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत मुरविण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना येथे जलसंधारणाच्या कामाला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनातून जिल्हाभरात जलसंधारणाच्या कामांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळत आहे. त्याला प्रतिसाद देत पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अशोक बनकर यांच्या नेतृत्वाखाली आणि भूजल तज्ज्ञ डॉ. पंडित वासरे (कृषी विज्ञान केंद्र, जालना) यांच्या मार्गदर्शनातून हे काम हाती घेण्यात आले आहे. पोलीस प्रशिक्षणार्थींच्या श्रमदानासह कुंडलिका-सीना फाऊंडेशनच्या संयुक्त सहभागातून प्रशिक्षण केंद्र परिसरात पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी जलसंधारणाच्या विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांवर ट्रेन्च-कम-बंड्स, तसेच पाण्याच्या प्रवाह क्षेत्रात मोठे जलशोषक खड्डे तयार करण्यात येत आहेत. कामाच्या शुभारंभाच्या वेळी १० जलशोषक खड्डे आणि २० ट्रेन्च-कम-बंड्स तयार करण्यात आले. संपूर्ण प्रशिक्षण केंद्र परिसरात एकूण २५ जलशोषक खड्डे आणि ५० ट्रेन्च-कम-बंड्स तयार करण्यात येणार आहेत.या जलसंधारण उपाययोजनांमुळे पावसाचे वाहून जाणारे लाखो लिटर पाणी परिसरातच अडवून जमिनीत मुरविणे शक्य होणार आहे. परिणामी भूजल पुनर्भरणास चालना मिळून परिसरातील भूजल पातळी उंचावण्यास मदत होणार आहे.समस्त महाजन संस्थेच्या विश्वस्त नूतन देसाई यांच्या माध्यमातून पोलीस प्रशिक्षण केंद्र परिसरात यापूर्वीही पाणलोट विकासाची विविध कामे करण्यात आली आहेत. यामध्ये पाझर तलाव, विहिरी तसेच कम्पार्टमेंट बंडिंगच्या कामांचा समावेश आहे. या कामांमुळे परिसरातील नागरी वसाहतींनाही त्याचे सकारात्मक परिणाम मिळत आहेत.यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे आरपीआय केशव गिरडकर, कुंडलिका-सीना फाऊंडेशनचे उदय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विठ्ठल राजकर, समस्त महाजन संस्थेचे अरविंद नाईकनवरे तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.“पावसाचा प्रत्येक थेंब वाहून न जाता जमिनीत मुरला पाहिजे,” या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे पोलीस प्रशिक्षण केंद्र परिसरात जलसंधारणाची भक्कम पायाभरणी होणार असून, भविष्यात भूजल पातळी वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.