जालना: राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून जालना महानगरपालिकेच्या ९९३ अधिकारी व कर्मचारी पदांच्या आकृतिबंध आणि सेवा नियमांना नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मनपा भरती प्रक्रिया केवळ नोकरभरती न राहता ती स्थानिक पातळीवरील नागरी समस्यांच्या निराकरणासाठी प्रभावी ठरावी, यासाठी अॅड. महेश धन्नावत यांनी जिल्हाधिकारी तथा जालना महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन सादर केले आहे.
अॅड. महेश धन्नावत यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, महापालिकेत ९९३ पदांची मोठी भरती होणार असल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक बेरोजगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, ही नियुक्ती करताना शहराच्या सर्व भागांचे प्रतिनिधित्व होणे आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण मनपा क्षेत्रातील प्रत्येक प्रभागातून (वॉर्ड/प्रभाग) किमान १२ स्थानिक उमेदवारांची निवड करण्यात यावी.
नगरसेवकांना शिफारसीचा अधिकार मिळावा
प्रभागातील प्रत्यक्ष अडचणी आणि भौगोलिक गरजांची नगरसेवकांना नेमकी जाणीव असते. या मुद्द्याकडे लक्ष वेधत, संबंधित प्रभागातील नगरसेवकांना किमान ३ स्थानिक लोकांची नावे नामनिर्देशित करण्याचा अधिकार महानगरपालिका प्रशासनाने द्यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी अॅड. धन्नावत यांनी केली आहे.
"स्थानिक वॉर्डातील व्यक्तीला आपल्या परिसरातील पाणी, रस्ते, स्वच्छता व इतर मूलभूत नागरी समस्यांची खडान् खडा माहिती असते. प्रत्येक प्रभागातून १२ प्रतिनिधी आणि नगरसेवकांच्या शिफारसीतून येणारे मनुष्यबळ यामुळे महापालिका प्रशासनाला भविष्यात वॉर्डनिहाय प्रश्न तात्काळ आणि प्रभावीपणे सोडवणे सोपे जाईल."
— अॅड. महेश धन्नावत
सर्वपक्षीय नेत्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करावा: अॅड. धन्नावत यांचे आवाहन
जालना शहराचा विकास आणि स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे अॅड. महेश धन्नावत यांनी म्हटले आहे. या मागणीला पाठिंबा देऊन आमदार अर्जुनराव खोतकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल, खासदार डॉ. कल्याण काळे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा विषय नेऊन सकारात्मक निर्णय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली आहे.
--