देशातील नामांकित उद्योजक व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
जालना - जालना जिल्हा आणि मराठवाड्याच्या औद्योगिक, लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षमतेला नवी दिशा देण्यासाठी आगामी ३ सप्टेंबर रोजी जालन्यात 'इंडस्ट्रियल समिट २०२६' चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शहरातील हॉटेल सिद्धार्थ द फर्न येथे सकाळी ९ वाजता या परिषदेचा शुभारंभ होईल. जालना फर्स्ट आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या समिटमध्ये देशातील नामांकित उद्योगपती, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि गुंतवणूकदार एकाच व्यासपीठावर येणार आहेत, अशी माहिती जालना फस्टचे अध्यक्ष गोविंद गोयल यांनी दिली.
कालिका स्टीलच्या कार्यालयात शनिवार, 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जालना फस्टचे जनसंपर्क अधिकारी राहुल अग्रवाल, उपाध्यक्ष शुभम सोनी, सचिव आयुष बन्सल यांची उपस्थिती होती.जालन्याला मराठवाड्याचे प्रमुख लॉजिस्टिक्स आणि निर्यात केंद्र म्हणून विकसित करणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क केंद्रास्थानी
जालन्यात नव्याने कार्यान्वित झालेले मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क हे या समिटचे प्रमुख केंद्रबिंदू असणार आहे. समृद्धी महामार्ग, मजबूत रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि ड्राय पोर्ट यांच्या एकत्रित लाभामुळे जालन्यातील औद्योगिक विकासाला नवे पंख मिळणार आहेत. या परिषदेत स्टील, सिमेंट, कृषी प्रक्रिया, ऑटोमोबाईल, सिड्स आणि ऊर्जा क्षेत्रातील नवीन औद्योगिक गुंतवणुकीवर विशेष चर्चा केली जाणार आहे.
विशेष मान्यवरांची उपस्थिती
या समिटसाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणचे अध्यक्ष गौरव दयाल आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह हे चीफ गेस्ट म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि 'विकास ग्रुप ऑफ कंपनीज'चे प्रतिनिधी या परिषदेत प्रामुख्याने सहभागी होतील.
उद्योग-शासन थेट संवाद आणि नोंदणी
या समिटच्या माध्यमातून उद्योजकांना थेट शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून आपल्या समस्या मांडता येतील. तसेच वीज, पाणी, जमीन आणि पायाभूत सुविधांबाबत पुढील कृतीची दिशा ठरवली जाईल, अशी यावेळी माहिती देण्यात आली. समिटमध्ये सहभागी होण्यासाठी https://jalnafirst.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन जालना फर्स्ट आणि जिल्हा प्रशासनाने केले आहे.
ड्रायपोर्टवर स्वतंत्र सत्र आणि थेट भेट
'इंडस्ट्रियल समिट २०२६' मध्ये ड्राय पोर्टवर आधारित एक विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये महत्त्वाच्या बाबींवर सखोल विचारमंथन होईल. जालन्यातून थेट निर्यात-आयात वाढवण्याच्या नव्या संधी निर्माण होणार आहे. उद्योगांचा लॉजिस्टिक्स खर्च आणि वेळ कमी करण्याचे उपाय शोधले जाणार आहे. समिट संपल्यानंतर उपस्थित सहभागी प्रतिनिधींसाठी जालना ड्राय पोची एक विशेष पाहणी भेट आयोजित करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
» ३ सप्टेंबर २०२६
» वेळ: सकाळी ९.०० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत
» स्थळ: हॉटेल सिद्धार्थ द फर्न, जालना.