खाकीचा थरारक प्रवास! पुलाअभावी टेंभुर्णी पोलिसांची विदर्भ सीमेवर 'बोट' कसरत;

जीव धोक्यात घालून गुन्हेगारांचा पाठलाग

Jalna Nayak    24-Aug-2026
Total Views |

या थरारक प्रवासाचा आणि प्रशासकीय अनास्थेचा संतापजनक प्रकार समोर आला
 
 
जालना नायक वृत्तसेवा

बी.डी.सवडे
टेंभूर्णी : कायद्याचे हात लांब असतात, पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे टेंभुर्णी पोलिसांचे पाय मात्र नदीच्या पात्रातच अडकून पडले आहेत! जाफराबाद तालुक्यातील वरुड ते डोलखेडा बुद्रुक या विदर्भ सीमेजवळ नदीवर पूलच नसल्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांना थेट जुगाड केलेल्या तराफ्यावर (नावेवर) पोलीस गाड्या घालून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या थरारक प्रवासाचा आणि प्रशासकीय अनास्थेचा संतापजनक प्रकार समोर आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
खाकीचा थरार आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या या भागात गुन्हेगार गुन्हे करून सहज पळ काढतात. त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथक जेव्हा पाठलाग करते, तेव्हा नदीच्या पात्रात कोणताही अधिकृत रस्ता किंवा पूल उपलब्ध नसतो. त्यामुळे ड्रम आणि लोखंडी पत्र्यांच्या सहाय्याने बनवलेल्या तात्पुरत्या नावेवर थेट पोलिसांची चारचाकी गाडी आणि दुचाकी चढवून दोरीच्या साहाय्याने पैलतीर गाठावा लागतो. थोडा जरी समतोल बिघडला तरी भयंकर अपघात होण्याची दाट शक्यता असूनही पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यासाठी स्वतःचा जीव मुठीत धरावा लागत आहे. याबत मिळालेल्या माहितीनुसार टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे  अधिकारी अविनाश राठोड व  त्यांचे सहकारी बाबासाहेब खार्डे व त्यांची टीम यांना गुप्त माहितीच्या आधारे इथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची टीम या गावाकडे निघाली. पण इथे जाण्यासाठी नदीवर पूल नसल्याने अखेर पोलिसांना होडीचा आधार घेऊन गाव गाठावे लागले.डोलखेडा बुद्रुक हे गाव विदर्भ सेमी जवळ असून ते टेंभुर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येतात
 
 
 
 भीषण वास्तव
गुन्हेगारांना रान मोकळे सीमेवरील पूलाच्या अभावामुळे गुन्हेगार या परिस्थितीचा फायदा घेत पसार होतात, तर पोलिसांचा वेळ नावेतून गाडी पार करण्यातच निघून जातो.ग्रामस्थांचाही जीव टांगणीला केवळ पोलीसच नाही, तर वरुड व डोलखेडा बुद्रुक परिसरातील ग्रामस्थांनाही दैनंदिन कामासाठी आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत याच धोकादायक प्रवासाचा सहारा घ्यावा लागतो.प्रशासनाचे दुर्लक्ष अनेक वर्षांपासून या ठिकाणी पक्का पूल उभारण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत, मात्र लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.खाकी गणवेशातील पोलिसांचा हा 'स्टंट' केवळ त्यांच्या धैर्याची नाही, तर व्यवस्थेच्या लाचार आणि सुस्त कारभाराची साक्ष देत आहे. एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता शासनाने या विदर्भ सीमेवरील नदीवर तातडीने पक्का पूल उभारावा, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.