पारध पोलिसांची पिंपळगाव रेणुकाई परिसरात गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई

; एका गुन्ह्यात पिकअपसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, तर दुसऱ्या घटनेत वाहनातून पडून बैल मृत.

Jalna Nayak    24-Aug-2026
Total Views |

पारध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विशाल अस्वार
वालसावंगी: पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या तस्करांवर पोलिसांनी एकाच दिवशी धडक कारवाई केली आहे. पिंपळगाव रेणुकाई येथे पिकअप वाहनाद्वारे अवैध गोवंश वाहतूक करणारे दोन वेगवेगळे गुन्हे उघडकीस आले असून, एका प्रकरणात ४ बैलांसह ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तर दुसऱ्या एका घटनेत वाहन हलगर्जीपणे चालवल्यामुळे वाहनातून खाली पडून एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
​पहिली घटना: ७ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ५:२५ वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव रेणुकाई येथील बैल बाजाराच्या समोर आरोपी (१) नासेर वाहेद कुरेशी (वय ३१, रा. शिवणा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि (२) शेख बाबु शेख करीम (वय ५५, रा. अजिंठा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) हे दोघेजण पिकअप वाहनामध्ये (क्र. MH28BB2303) क्रूरतेने बैलांची वाहतूक करत असताना रंगेहात मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी ४ बैल व १ पिकअप वाहन असा एकूण ७,१०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वाहनातून पडून बैलाचा मृत्यू, चालक फरार
दुसऱ्या एका घटनेत, आरोपी (१) सलीम मुसा कुरेशी आणि (२) गफ्फार मुसा कुरेशी (रा. शिवना, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) हे पिकअप वाहन (क्र. MH48-3709) मधून बैलांची बेकायदेशीररीत्या वाहतूक करत होते. हे वाहन अत्यंत हलगर्जीपणाने व निष्काळजीपणाने चालवल्यामुळे वाहनातील एक बैल खाली पडून मरण पावला. बैल मृत पावल्याचे माहीत असूनही आरोपी चालकाने वाहन घटनास्थळावरून पळवून नेले. याप्रकरणी वाहन चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल १७०२ कृष्णा मोतीराम गवळी यांनी या दोन्ही प्रकरणांत फिर्याद दिली असून, दोन्ही गुन्ह्यांत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यावर होणारे अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सपोनि संतोष माने यांच्या आदेशानुसार या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्हि. एस. नेमाने हे करत आहेत.