विशाल अस्वार
वालसावंगी: येथील गायरान भागात जवळपास ३० एकर क्षेत्रावर जर आज सौरऊर्जा प्रकल्प उभारला गेला असता, तर शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा वीज मिळाली असती. यामुळे रात्री-बेरात्री जिवाचा धोका पत्करून पिकांना पाणी देण्याच्या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्ती झाली असती. मात्र, स्थानिक पातळीवरील आक्षेपांमुळे हा प्रकल्प बारगळला आणि आता याच उपकेंद्रावरून इतर गावांना वीज जोडण्या दिल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन अडचणी निर्माण झाल्या आहेत.
वालसावंगी येथील गायरान भागात सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊन प्राथमिक कामेही पूर्ण करण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पाची वीज थेट वालसावंगी फाटा उपकेंद्रात न देता धावडा केंद्रात दिली जाणार होती. वालसावंगीलाच थेट वीज पुरवठा करावा, या मागणीसाठी काहींनी आक्षेप घेतला, परिणामी सुरू झालेला प्रकल्पच बंद पडला आणि नंतर हा प्रकल्प धावडा येथे हलवण्यात आला. जर तेव्हा हा प्रकल्प रद्द झाला नसता, तर आज वालसावंगीच्या शेतकऱ्यांना दिवसा कायमस्वरूपी वीजपुरवठा मिळाला असता.
इतर गावांना वीज जोडणी दिल्याने वाढणार भार
एकीकाळी 'गायरान जमिनीवरील सौरऊर्जा प्रकल्पाची वीज इतर गावांना नको' म्हणून प्रकल्प रद्द करण्यात आला; परंतु आता कुणालाही माहिती न देता वालसावंगी फाटा येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रातून जाळीचादेव आणि वाढोना येथे वीज जोडणी करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, आगामी काळात वदोडतांगडा व पद्मावती या गावांनाही याच उपकेंद्रातून वीज जोडणी देण्याचे नियोजन आहे. यामुळे उपकेंद्रावरील भार वाढून वीज दाब मोठ्या प्रमाणात कमी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
जोडण्या थांबवण्याची ग्रामस्थांची मागणी
अगोदरच कोणालाही विश्वासात न घेता जाळीचादेव आणि वाढोना येथे वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. आता उर्वरित गावांना या उपकेंद्रावरून वीज जोडणी देऊ नये, त्यांना त्यांच्या मूळ स्रोतावरूनच वीज द्यावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. वाढत्या वीजभारामुळे शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.