जालना : मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागातील तब्बल ३१ विद्यार्थ्यांची IBM मशीन लर्निंग आणि अनुप्रयुक्त कृत्रिम बुद्धिमत्ता इंटर्नशिप २०२६ साठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भारत केअर्स यांच्या माध्यमातून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) आणि IBM यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या ६ आठवड्यांच्या इंटर्नशिपमध्ये विद्यार्थ्यांना मशीन लर्निंग आणि अनुप्रयुक्त कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
या इंटर्नशिपदरम्यान विद्यार्थ्यांना कृतीवर आधारित शिक्षण, वास्तविक जगातील प्रकल्पांवर काम करण्याचा अनुभव, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि उद्योगक्षेत्रात मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे मिळणार आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानातील कौशल्ये विकसित करून भविष्यातील करिअरच्या विविध संधींसाठी स्वतःला सक्षम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्राचे मा. आरोग्यमंत्री तथा मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेश टोपे, सचिव सौ. मनीषाताई टोपे, प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड आणि सहायक प्रशासकीय अधिकारी श्री. राहुल भालेकर यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. बिरादार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानातील कौशल्ये विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. IBM सारख्या जागतिक स्तरावरील संस्थेशी संबंधित इंटर्नशिपसाठी ३१ विद्यार्थ्यांची निवड होणे ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे.”विभागप्रमुख प्रा. एस. एन. गिते यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सांगितले की, विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता उद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव देण्यावर विभागाचा विशेष भर आहे. या इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाबरोबरच त्यांच्या व्यावसायिक कौशल्यांना आणि रोजगारक्षमतेला निश्चितच चालना मिळेल.ट्रेनिंग ऑफिसर प्रा. कृष्णा ताठे यांनीही निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भविष्यात विद्यार्थ्यांना नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये इंटर्नशिप तसेच रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील राहील, असे त्यांनी सांगितले.