भोकरदन (प्रतिनिधी): भोकरदन तालुक्यातील मौजे मनापूर येथील विद्यार्थिनींसाठी सुरू करण्यात आलेली 'मानव विकास मिशन' योजनेअंतर्गतची बस वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थिनींचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय हनुमंतराव दळवी, व पालकवर्ग आणि ग्रामस्थांनी रा.प.म. जाफ्राबाद-भोकरदन आगार प्रमुखांना निवेदन दिले आहे.
मनापूर भागातील सुमारे ३५ ते ४० विद्यार्थिनी दररोज या बसने शाळेत ये-जा करतात. शाळा सकाळी ९:४५ ते दुपारी ४:३० या वेळेत भरते. मात्र, एसटी बसच्या फेऱ्या वेळेवर होत नसल्याने विद्यार्थिनींना दररोज परिपाठ व प्रार्थनेला मुकावे लागते, तसेच शाळेत उशिरा पोहोचल्यामुळे शिक्षकांचे बोलणे ऐकावे लागते. शाळा सुटल्यानंतरही बस वेळेवर सुटत नसल्याने विद्यार्थिनींना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. मनापूर फाट्यावर थांबलेल्या विद्यार्थिनींनी सामाजिक कार्यकर्ते संजय दळवी यांच्याकडे आपल्या अडचणी मांडल्या. त्यानंतर ग्रामस्थ व पालकांच्या सहीने आगार प्रमुखांना तातडीने निवेदन सुपूर्द करण्यात आले.या निवेदनावर संदीप दळवी, अण्णा दळवी, प्रल्हाद दळवी, सदाशिव दौड , विलास खांडवे, समाधान पांडे, माधु इंगळे, भाऊसाहेब कवटे , समाधान शिन्दे, गजू दळवी, विष्णू घायवट कैलास कवटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत,
आंदोलनाचा इशारा
मानव विकास मिशनची ही बस थेट शाळेपर्यंत वेळेवर पाठवण्यात यावी, अन्यथा आपल्या हक्कासाठी व न्यायासाठी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संजय हनुमंतराव दळवी यांनी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.