जालनाः वर्ष उलटल्यानंतरही गणेश विसर्जन कुंडाची ना सुरक्षा ना उपाययोजना
महानगर पालिकेचे दुर्लक्ष, उत्सवा दरम्यानच येते जाग
Jalna Nayak 25-Aug-2026
Total Views |
जालनाः शहरातील मोती तलाव परिसरात महानगर पालिकेने तब्बल एकोणवीस कोटी रूपये खर्च करून गणेश विसर्जन कुंड उभारले आहे. मात्र वर्ष उलटल्यानंतरही विसर्जन कुंड परिसरात ना सुरक्षेच्या उपाययोजना अथवा इतर विकास कामांबाबत काही हालचाल झाली नसल्याचे चित्र आहे. कुंड पाण्याने तुंडूब भरले असून कुंडाच्या सभोवतालीही मोठ्या प्रमाणात पाणी साचून झुडपे वाढली आहेत.
गणपती उत्सव पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असून उत्सवाची सर्वत्र जय्यत तयारी केली जात आहे. जालना शहरताल गणेश मूर्तींचे विसर्जन सुरळीत व्हावे म्हणून तसेच मोती तलावाचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून तत्कालीन आयुक्त संतोष खांडेकर यांच्या कार्यकाळात या दोन कुंडाचे बांधकाम करण्यात आले. बांधकाम करते वेळी अनेक दिवास्वप्ने दाखविण्यात आली. प्रत्यक्षात वर्ष उलटूनही परिस्थिती फारशी बदललेली नाही. मध्यंतरी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत व इतर अधिकाऱ्यांनी कुंड परिसराची पाहणी केली होती. त्यानंतरही काहीच बदल झालेला दिसला नाही. विसर्जन कुंड वीस ते पंचवीस फूट खोल असून रस्त्या लगत आहेत. येथे कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज असताना महापालिकेकडून येथे कोणतीही उपाययोजना केलेली नाही. अनेक नागरिक विसर्जन कुंड परिसरात सहज फिरत असतात. आता एक वर्ष होत असताना आयुक्तांनी कुंड परिसरात आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना तसेच रखडलेली विकास कामे पूर्ण करण्याची अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.