जालना : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणास १० वर्षे सक्तमजुरी

पारध पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास पूर्ण केला

Jalna Nayak    25-Aug-2026
Total Views |
 
विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश कृपेश मोरे यांनी २५ ऑगस्ट रोजी हा निकाल दिला.
 
जालना : सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याप्रकरणी विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने तरुणास १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच त्याला मदत करणाऱ्या दोघांना प्रत्येकी सहा महिने सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश कृपेश मोरे यांनी २५ ऑगस्ट रोजी हा निकाल दिला.
पीडित मुलगी पारध (ता. भोकरदन) परिसरातील गावात राहत होती. सिल्लोड तालुक्यातील भारणी येथील नितीन दत्तू पोटदुखे हा छोटा हत्ती वाहन चालवत होता. कामानिमित्त त्याच्या वाहनातून प्रवास करणाऱ्या मुलीशी त्याची ओळख झाली. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. १२ जुलै २०१९ रोजी मुलीच्या आईने जवाहरनगर पोलिस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर नितीन हा वडिलांच्या सांगण्यावरून मुलीला घेऊन करमाड पोलिस ठाण्यात हजर झाला. मुलीला महिला सुधारगृहात पाठवण्यात आले. नंतर आई-वडिलांनी विचारपूस केल्यानंतर तिने संपूर्ण हकीगत सांगितली. २७ सप्टेंबर २०१९ रोजी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तिने महिला दक्षता समितीच्या सदस्यासमोर फिर्याद दिली. हे प्रकरण पारध पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.पारध पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास पूर्ण केला. सरकार पक्षाने आठ साक्षीदार तपासले. पीडितेचे वय सिद्ध करणारा शाळेचा निर्गम उतारा तसेच वैद्यकीय व डीएनए अहवाल हे महत्त्वाचे पुरावे ठरले.नितीन पोटदुखेला भादंवि कलम ३७६(२)(एन) आणि पोक्सो कायद्यातील कलम ४ व ८ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा झाली. तसेच नितीन, शिवाजी व बाली उर्फ किरण यांना भादंवि कलम ३६३ सह ३४ अन्वये प्रत्येकी सहा महिने सक्तमजुरी व दंड ठोठावण्यात आला. दंडाची एकूण २० हजार रुपयांची रक्कम पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सरकार पक्षातर्फे विशेष जिल्हा सरकारी अभियोक्ता वर्षा लक्ष्मीकांत मुकीम यांनी काम पाहिले.