स्थानिक व्यावसायिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणार

जालना येथे उद्योग मंत्रालयाच्यावतीने एकदिवसीय कार्यशाळा संपन्न;

Jalna Nayak    25-Aug-2026
Total Views |
 
जैन भवन, सकलेचा नगर येथे लहान-सहान व तरुण उद्योजकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा
 
जालना, दि. २५ (प्रतिनिधी) :उद्योग सुरू करणे ही व्यवसायाची पहिली पायरी असली, तरी उत्पादनाचे योग्य विपणन (मार्केटिंग), ब्रँडिंग, गुणवत्ता आणि बाजारपेठेचा विस्तार तितकाच महत्त्वाचा आहे. जालन्यातील तरुण, महिला आणि पुरुष उद्योजकांनी केवळ जिल्हा किंवा राज्यापुरते मर्यादित न राहता देश-विदेशातील बाजारपेठेत आपला ठसा उमटवावा, यासाठी उद्योग मंत्रालय कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्रालयाच्या मुंबई येथील प्रतिनिधी सौ. पौर्णिमा शिरीषकर यांनी केले.व्यापारी महासंघ, जनरल मर्चंट्स असोसिएशन (जिल्हा जालना) आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने जैन भवन, सकलेचा नगर येथे लहान-सहान व तरुण उद्योजकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मराठवाडा विभागीय अध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास मुंबई येथील उद्योग मंत्रालयाचे अधिकारी विवेक शिंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश सारणीकर, कॅटचे राज्य उपाध्यक्ष सतीश पंच, सुखदेव बजाज, प्रवीण मोहता, महिला आघाडीच्या सौ. सीता मोहिते-पाटील, सौ. आनंदी अय्यर आणि सौ. प्रिया जोशी उपस्थित होते.
 
जैन भवन, सकलेचा नगर येथे लहान-सहान व तरुण उद्योजकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा
 
 
प्रास्ताविक करताना हस्तीमल बंब म्हणाले की, शासनातर्फे उद्योजकांना चालना देण्यासाठी विविध योजना, अनुदान आणि नाममात्र व्याजाने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यापूर्वी महिलांसाठी विशेष अधिवेशन घेऊन अनेक प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे दाखल करण्यात आले असून, काही महिलांचे मुद्रालोनचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. आजची ही कार्यशाळा प्रामुख्याने उद्यम आधार प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या तरुण व होतकरू व्यावसायिकांसाठी आयोजित करण्यात आली होती. यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शासकीय योजना आणि अनुदानाबाबत कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सौ. शिरीषकर यांनी उपस्थितांना शासकीय ई-निविदा, पोर्टलवरील नोंदणी, आणि व्यवसायातील अडचणी सोडविण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. नुकताच जालना जिल्ह्याला शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्याबद्दल राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे सांगत त्यांनी जालन्याच्या व्यापारी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. सतीश पंच यांनी लहान उद्योजकांना महान उद्योजक घडविण्याच्या उद्देशाने अशा कार्यशाळांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमात विविध योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले असून, उद्यम आधार प्राप्त व नोंदणी केलेल्या १२८ उद्योजकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मोदी यांनी केले, तर आभार मकरंद सावजी यांनी मानले. यशस्वीतेसाठी राम मोहिते, अ‍ॅड. सुब्रह्मण्यम अय्यर, प्रमोद जोशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.