जालना : नागेवाडी परिसरात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून

जालना शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Jalna Nayak    26-Aug-2026
Total Views |
 
घटना मंगळवारी (ता. २५) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
 
जालना : शहरातील नागेवाडी परिसरात झिरो पॉईंटजवळील एका हॉटेलमध्ये चहा घेत असलेल्या २४ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी (ता. २५) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, जालना शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
निखिल परमेश्वर पवार (वय २४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निखिल हा नागेवाडी परिसरातील झिरो पॉईंटजवळील एका हॉटेलमध्ये चहा घेत असताना संतोष उर्फ पिंट्या लांडे याच्यासह चौघेजण काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून तेथे आले. ‘माझ्या मेलेल्या भाचीची बदनामी का करतोस?’ असे म्हणत त्यांनी निखिल याच्यावर धारदार चाकूने हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. गंभीर जखमी झालेल्या निखिलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी वाहनातून पसार झाले. या प्रकरणी मयत निखिलचा भाऊ श्याम पवार यांच्या फिर्यादीवरून संतोष उर्फ पिंट्या लांडे, अर्जुन लांडे, सतीश आणि सोनू एखंडे या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक एम. बी. स्कॉट यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या काही काळात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचा धाक कितपत राहिला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेषतः गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडे धारदार शस्त्रे व इतर घातक साधने सहज उपलब्ध होत असल्याने अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त होत आहे. या घटनेमुळे जालना शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.