दारूमुक्तीसाठी शिरपूरच्या महिला रस्त्यावर

ग्रामसभेच्या ठरावानंतर पोलिसांना थेट इशारा

Jalna Nayak    26-Aug-2026
Total Views |

महिलांनी आता निर्णायक लढा उभारला आहे
 
परतूर- परतूर तालुक्यातील शिरपूर गावात अवैध देशी व गावठी दारूविक्रीविरोधात महिलांनी आता निर्णायक लढा उभारला आहे. गावातील तरुणाई आणि कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या अवैध दारूविक्रीमुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर करत थेट पोलिस प्रशासनालाच जाब विचारला. सरपंचांच्या पुढाकाराने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना गावात पाचारण करण्यात आले आणि महिलांनी आपल्या व्यथा, तक्रारी व संताप त्यांच्यासमोर मांडला.
या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे यांनी मंगळवारी शिरपूर येथे भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी महिलांनी अवैध दारूविक्री करणाऱ्यांची नावे व माहिती पोलिसांकडे सुपूर्द करत संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या बैठकीस सरपंच शिवाजी थोरवे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाबाराव गुंड तसेच ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. महिलांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांनी अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.दरम्यान, गावातील दारूविक्रीचा प्रश्न महिलांनी यापूर्वी सरपंच शिवाजी थोरवे यांच्याकडे मांडला होता. त्यानंतर सरपंच आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी संबंधित दारूविक्रेत्यांना समज देऊन विक्री बंद करण्याचे आवाहन केले. त्यानुसार काहींनी अवैध व्यवसाय बंद केला; मात्र एक-दोन जणांकडून दारूविक्री सुरूच राहिल्याने महिलांचा संयम अखेर संपला. ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर करून त्यांनी थेट पोलिस प्रशासनाची मदत मागितली. शिरपूरमधील महिलांनी उभारलेला हा दारूमुक्तीचा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, पोलिसांच्या आश्वासनानंतर प्रत्यक्षात कितपत कठोर कारवाई होते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.