जालन्यात अवैध वाळू कारवाईदरम्यान तहसीलदार आणि पथकावर जीवघेणा हल्ला

२१ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल!

Jalna Nayak    26-Aug-2026
Total Views |
 
आरोपींनी महसूल पथकाला धक्काबुक्की करत शिवीगाळ केली
 
जालना, दि. २६ ऑगस्ट २०२६: जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरुद्ध महसूल विभागाने केलेल्या धडक कारवाईदरम्यान तहसीलदार आणि त्यांच्या पथकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गोदावरी नदीपात्रातील गोंदी येथील सिद्धेश्वर पॉईंटवर बुधवारी सकाळी ६:३० वाजता ही कारवाई सुरू असताना आरोपींनी महसूल पथकाला धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
गुप्त माहितीच्या आधारे अंबडचे तहसीलदार सोमेश मोहिते आपल्या इतर पाच कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. तिथे ३ छोटे व ७ मोठे हायवा आणि ३ लोडर उत्खननात व्यस्त असल्याचे दिसून आले. कारवाईदरम्यान ५ हायवा व ३ लोडर घटनास्थळावरून पसार होत असताना त्यांनी पथकाच्या खाजगी गाडीला जोरदार धडक दिली, ज्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले. तसेच तहसीलदार सोमेश मोहिते, ग्राम महसूल अधिकारी दीपक लव्हाळे, सतीश शिंदे, महसूल सेवक अरुण पठाडे, सोमनाथ सरफळे व पपेश बुलबले यांना मारहाण करत शासकीय कर्तव्यात अडथळा आणण्यात आला.घटनेची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून, उपविभागीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गोंदी पोलीस ठाण्यात तहसीलदार यांच्या फिर्यादीवरून गोपीनाथ मुरलीधर सातपुते, गणेश विठ्ठल सावंत यांच्यासह एकूण २१ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, पर्यावरण संरक्षण कायदा आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.घटनास्थळावरून ५ हायवा, ३ दुचाकी आणि सुमारे ४५० ते ५०० ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके रवाना करण्यात आली असून, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या दोषींवर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.