जालना - कृत्रिम पाऊस पाडावा यासाठी आ. अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असून यावर सकारात्मक विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात दरवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत यंदा 20% कमी पाऊस झाल्याची सरकारी आकडेवारी आहे. तथापि प्रत्यक्षात सर्वदूर आणि समान पाऊस झालेला नसल्यामुळे ही आकडेवारी गैरलागू ठरत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निम्मादेखील पाऊस झालेला नाही, हे वास्तव आहे. जालना जिल्ह्यात 230 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली असली तरी प्रत्यक्षात पाऊस खूप कमी झालेला आहे. तसेच पर्जन्यमापक यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे तसेच चुकीच्या नोंदी होत असल्याचे यापूर्वीच दिसून आले आहे. 30 जुलैनंतर जालना जिल्ह्यात एकही मोठा पाऊस झालेला नाही. फवारणी केल्यासारखा किरकोळ पाऊस पडतो. परिणामी खरीपातील पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. दमदार पाऊस नसल्यामुळे पिकेही जोमदार नाहीत. सोयाबीनसारखे पीक ऐन फुलोऱ्यात असताना पाऊस नसल्याने त्याचा मोठा फटका बसणार आहे. खरिपातील महत्त्वाचे पीक असलेले कापूस, मका, तूर, सोयाबीन, उडीद, मूग ही पिके धोक्यात आली आहेत. अत्यल्प पावसामुळे पिके हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आश्चर्य म्हणजे आतापासूनच बाजारपेठेवर परिणाम झालेला दिसून येत आहे. आजही अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. रानामध्ये हिरवा चारा नसल्याने गुराढोरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरुवातीच्या पावसामुळे काही भागातील विहिरींना पाणी आल्यामुळे तुषार आणि ठिबकद्वारे काही पिके जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तथापि एकूण चित्र भयावह आहे.मराठवाड्यातील खरीप हंगामाची पिके जगवायची असतील तर तातडीने कृत्रिम पाऊस पाडण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी 2024 मध्ये सोलापूर,बीड आणि जालन्यात कृत्रिम पाऊस पाडण्यात आला होता. सुदैवाने सध्या आकाशात ढग जमून येतात. पाऊस पाडण्यासाठी ढगांची मुबलकता आहे. त्यामुळे शासनाने प्रथम प्राधान्याने कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन तातडीने करावे ही आग्रहाची आणि तळमळीची विनंती आहे.