भोकरदन : कौटुंबिक वादातून मेहुण्याने दोन साथीदारांच्या मदतीने भाऊजीला काठी व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील मुठाड फाट्याजवळ २५ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कृष्णा शेषराव इंगळे (वय ३८, रा. इब्राहिमपूर) यांचा दोन दिवसांच्या उपचारानंतर गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी मुख्य आरोपी गजानन गणेश डांगे (रा. कुंभारी) याला अटक केली असून, त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
कृष्णा इंगळे व त्यांच्या पत्नीमध्ये किरकोळ कौटुंबिक वाद झाला होता. या वादाची माहिती पत्नीने तिचा भाऊ गजानन डांगे याला दिली. त्यानंतर संतापलेल्या गजानन डांगे याने दोन साथीदारांच्या मदतीने २५ ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास मुठाड फाट्याजवळ कृष्णा इंगळे यांना अडविले. तिघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी तसेच काठी व लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या पाठीवर आणि छातीच्या बरगड्यांवर गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर नागरिकांनी मध्यस्थी करून मारहाण थांबविली. गंभीर जखमी कृष्णा इंगळे यांना तातडीने भोकरदन येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कृष्णा इंगळे यांचे भाऊ संतोष शेषराव इंगळे (वय २९, रा. इब्राहिमपूर) यांच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर तपासात मारहाणीची बाब स्पष्ट झाल्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ११५(२) व ३(५) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी गजानन डांगे याला अटक केली आहे. त्याच्यासोबत असलेल्या दोन फरार आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच त्यांनाही अटक केली जाईल, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल बांगर यांनी दिली. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास इब्राहिमपूर येथील त्यांच्या शेतात कृष्णा इंगळे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पोलिस करीत आहेत.