सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी संस्कृत महाविद्यालयाची वाटचाल संस्कृत विषयात ५० विद्यार्थी पदव्युत्तर पदवीचे

संस्कृत भाषेच्या प्रसार आणि प्रचारासह अध्ययन- अध्यापनात प्रभाव

Jalna Nayak    27-Aug-2026
Total Views |
 
भारतीय ज्ञानपरंपरेचे संवर्धन व प्रसार हे महाविद्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट
 
 
संस्कृत दिन विशेष
सुहास सदाव्रते
 
जालना : बदलत्या तंत्रज्ञानाच्या आणि 'एआय' जमान्यात भाषा अभ्यास आता काहीसा सोपा होत आहे. असे असतानाही संस्कृत भाषेच्या प्रसार आणि प्रचारासह अध्ययन- अध्यापनात प्रभाव वाढत आहे. याचेच आदर्श उदाहरण म्हणजे अंबड येथील सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी संस्कृत महाविद्यालय होय. संस्कृत महाविद्यालयातील ५० विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे...
महानुभाव साहित्य शिक्षण संशोधन प्रतिष्ठान संचलित, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक मान्यताप्राप्त सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी संस्कृत महाविद्यालय, अंबड या संस्थेची स्थापना सन २०१८ मध्ये झाली. स्थापनेपासूनच संस्कृत भाषा, महानुभाव परंपरेतील शास्त्र अध्ययन आणि भारतीय ज्ञानपरंपरेचे संवर्धन व प्रसार हे महाविद्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे.
महाविद्यालयात संस्कृत विषयाचे शास्त्रशुद्ध व गुणवत्तापूर्ण अध्यापन केले जाते. आजपर्यंत सुमारे १५० विद्यार्थ्यांना संस्कृत विषयाचे अध्यापन करण्यात आले असून, त्यापैकी ५० विद्यार्थ्यांनी एम.ए. संस्कृतचे शिक्षण पूर्ण केले आहे. संस्कृत शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पदवीचे शिक्षण न देता भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि ज्ञानपरंपरेशी जोडण्याचे कार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून केले जात आहे.महाविद्यालयाच्या अध्यापनामध्ये महानुभाव परंपरेतील पारंपरिक शास्त्र अध्ययन याला विशेष महत्त्व देण्यात येते. महानुभाव साहित्याची समृद्ध परंपरा, संस्कृत वाड.मय, भारतीय तत्त्वज्ञान तसेच भारतीय ज्ञानपरंपरेतील विविध ज्ञानशाखांचे अध्ययन विद्यार्थ्यांना करून दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे सखोल ज्ञान मिळण्यासोबतच आपल्या प्राचीन ज्ञानपरंपरेची ओळख आणि तिचे महत्त्व समजून घेता येते.संस्कृत ही भारतीय ज्ञानपरंपरेची प्रमुख वाहक भाषा असून, तिच्या माध्यमातून भारतीय चिंतन, तत्त्वज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य महाविद्यालय करीत आहे. स्थापनेपासून आजपर्यंतच्या या प्रवासात अनेक विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयाचे अध्ययन करून उच्च शिक्षणाची वाटचाल केली आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारतभूषण शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत अध्यापन, महानुभाव परंपरेतील शास्त्र अध्ययन आणि भारतीय ज्ञानपरंपरेच्या संवर्धनाचे कार्य सातत्याने सुरू आहे. २०१८ पासून सुरू झालेला संस्कृत शिक्षणाचा हा ज्ञानयज्ञ आज १५० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला असून ५० विद्यार्थ्यांनी एम.ए. संस्कृतची पदवी प्राप्त केली आहे, ही महाविद्यालयासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे,अशी प्रतिक्रिया दिली आहे.
=========