घोट-घोट पाण्यावर जगवलेला ऊस जळून खाक; सलग दुसऱ्या वर्षी निचळ कुटुंबावर संकट

आधीच दुष्काळाची झळ, त्यात आगीचे तांडव

Jalna Nayak    27-Aug-2026
Total Views |
 
ऊस डोळ्यादेखत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे.
 
घनसावंगी : घनसावंगी तालुक्यातील आवलगाव येथील शेतकरी विठ्ठल नारायण निचळ यांच्या गट क्रमांक १ मधील ८० आर क्षेत्रातील ऊस पिकाला आग लागून मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी त्यांच्या शेतातील ऊस जळाल्याने निचळ कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. घोट-घोट पाणी देत, मोठा खर्च करून जगविलेला ऊस डोळ्यादेखत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे.
पावसाने ओढ दिल्याने यंदा शेतकरी आधीच अडचणीत सापडले आहेत. उपलब्ध पाण्यावर ऊस पीक जगविण्यासाठी निचळ यांनी मोठी मेहनत घेतली. पिकासाठी पाणी, खते, औषधे आणि मजुरीवर खर्च करून पीक उभे केले होते. मात्र, अचानक लागलेल्या आगीने संपूर्ण पीक जळून खाक झाल्याने कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.निचळ यांच्या शेतातून विद्युत डीपी असल्याने त्यापासून धोका निर्माण होत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. ही डीपी शेतातून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावी, यासाठी निचळ यांनी संबंधित वीज विभाग तसेच प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. अनेक वेळा विनंती करूनही डीपी स्थलांतराबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याची त्यांची तक्रार आहे.मागील वर्षीही याच शेतातील ऊस जळाला होता. त्यानंतर यंदा पुन्हा ऊस जळाल्याने निचळ कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग दोन वर्षे उभे पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कुटुंबीय मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात आले.
नुकसानभरपाईसह कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी
जळालेल्या ऊस पिकाचा तातडीने पंचनामा करून शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शेतातील विद्युत डीपी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी, अशी मागणी विठ्ठल नारायण निचळ यांनी केली आहे.
आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना सलग दोन वर्षे ऊस जळाल्याने निचळ कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी. वेळीच उपाययोजना न झाल्यास भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची शक्यता असून, अशी विपरीत घटना घडल्यास संबंधित वीज विभाग व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा निचळ कुटुंबीयांनी दिला आहे.