जालना शहरात सीटी बस धावणार!

आमदार अर्जुन खोतकरांची मोठी घोषणा; चालना आगाराला मिळाल्या पाच आधुनिक बसेस

Jalna Nayak    28-Aug-2026
Total Views |

प्रायोगिक तत्त्वावर दोन सिटी बसेस सुरू
 
जालनाः शहराचा वाढता विस्तार पाहता सर्वसामान्यांना प्रवास सुलभ व कमी खर्चात व्हावा म्हणून आता सीट बस म्हणजेच शहर बससेवा सुरू झाली असून प्रायोगिक तत्वावर याचा शुभारंभ आ.अर्जुन खोतकर यांनी शुक्रवारी सकाळी केला.शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसांत प्रायोगिक तत्त्वावर दोन सिटी बसेस सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार अर्जुन खोतकर यांनी केली. यासाठी सर्वेक्षणाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पंडितराव भुतेकर, शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले, युवा सेनेचे राज्य पदधिकारी अभिमन्यू खोतकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
जालना आगारासाठी आधुनिक बसेस उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत चालना आगाराला पाच नव्या बसेस उपलब्ध झाल्या आहेत. या बसेसचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. नव्या बसेसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुविधाजनक प्रवासाचा लाभ मिळणार आहे. आमदार खोतकर यांनी सांगितले की, जालना शहरात यापूर्वी सार्वजनिक वाहतुकीची चांगली व्यवस्था होती. मात्र, सध्या शहरातील नागरिकांची वाढती गरज लक्षात घेता सिटी बस सेवा पुन्हा सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच डेपो व्यवस्थापनाशी चर्चा झाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर दोन बसेस सुरू करण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, दोन-तीन दिवसांत शहरातील नागरिकांसाठी सिटी बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे खोतकर यांनी स्पष्ट केले. जालना आगाराला पाच नव्या बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार खोतकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी आणि एसटी प्रशासनाचे आभार मानले.भविष्यात चालना आगाराला आणखी आधुनिक बसेस मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले. लोकार्पण कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, अधिकारी, डेपो व्यवस्थापक, एसटी कर्मचारी तसेच नागरिकांची उपस्थिती होती.
प्रवाशांना मोठा दिलासा
नव्या बसेस उपलब्ध झाल्याने चालना आगाराच्या वाहतूक व्यवस्थेला बळ मिळणार असून, ग्रामीण भागासह शहरातील प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. विशेषतः सिटी बस सेवा सुरू झाल्यास शहरातील नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.