जालन्यातील जनहिताच्या प्रमुख प्रकल्पांना निधी उपलब्ध करा - खा. डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

* वाढत्या गुन्हेगारीवर आळा घाला, पोलीस ठाण्यांची संख्या वाढविण्याची केली मागणी.

Jalna Nayak    28-Aug-2026
Total Views |

 विविध मागण्याचे स्वतंत्र निवेदने
जालना : जालना शहर व जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत खासदार डॉ. कल्याण काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्याचे स्वतंत्र निवेदने देऊन तातडीने आवश्यक प्रशासकीय व निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे. औद्योगिक प्रदूषण, जालना येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचा विकास, हातवन बृहत् लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी भूसंपादन, घाणेवाडी तलावाची दुरुस्ती तसेच शेतकरी कर्जमाफी यासारख्या प्रश्नांकडे खा. डॉ. कल्याण काळे यांनी मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले असल्याची माहिती डॉ. डॉ. कल्याण काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जालना शहर व परिसरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वायू, जल व ध्वनी प्रदूषणाची समस्या गंभीर होत असल्याचे खासदार काळे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. एमआयडीसी परिसरातील गावांमध्ये नागरिकांना धूर, धुळीचे कण, पाण्याच्या गुणवत्तेच्या तक्रारी तसेच श्वसनासंबंधी त्रास होत असल्याने स्वतंत्र व सखोल प्रदूषण तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. औद्योगिक आस्थापनांचे विशेष ऑडिट करून नियमांचे उल्लंघन करणार्‍या उद्योगांवर कठोर कारवाई करावी, तसेच सांडपाण्याची नियमित तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
जालना येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या प्रलंबित बांधकामांना गती देऊन आवश्यक मनुष्यबळ व प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. संस्थेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजासाठी कार्यरत शिक्षकांना कायमस्वरूपी पदस्थापना, स्वतंत्र नोंदणी/आस्थापना व्यवस्था, पूर्णवेळ संचालकाची नियुक्ती तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी व मनुष्यबळ देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, जालना तालुका व जिल्ह्यातील हातवन बृहत् लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही गतीने पूर्ण करून प्रकल्पाच्या कामासाठी 150 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास त्याचा फायदा जालना शहरासह परिसरातील शेतीला सिंचनाची सुविधा मिळून शेतकर्‍यांना दीर्घकालीन लाभ होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जालना शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या घाणेवाडी तलावाच्या सांडव्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि तलावातील गाळ काढण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही खासदार काळे यांनी केली आहे. सांडव्यांच्या भिंतींमध्ये गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्याने भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता असून, अतिवृष्टी झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तलावातील गाळ साचल्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी झाली असून गाळ काढल्यास शहराच्या पाणीपुरवठ्याला मोठा फायदा होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
यासोबतच राज्यातील पात्र शेतकर्‍यांना न्याय मिळावा यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026’ अधिक सर्वसमावेशक पद्धतीने राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. 31 मार्च 2019 पूर्वीची पात्र थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांचा योजनेंतर्गत समावेश करावा, नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रोत्साहनपर लाभाची कमाल मर्यादा दोन लाख रुपयांपर्यंत वाढवावी, जमीन वर्ग-2च्या कारणामुळे पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नयेत, तसेच कागदपत्रे व ओळख क्रमांकाच्या तांत्रिक अडचणींमुळे कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.या सर्व प्रश्नांवर मुख्यमंत्री यांनी संबंधित विभागांना तातडीने निर्देश देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा आणि प्रलंबित कामांना गती द्यावी, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. सदरील पत्रकार परिषदेला श्री राजेंद्र राख,बदरभाई चाऊस,नंदू भैया जांगडे,कृष्णा पा.पडूळ,संजय मुथा,नरेंद्र मित्तल,सुनील चौधरी,अब्दुल हाफिज,संजय इंगळे,शेख वासिम,अशोकराव उबाळे,राजेंद्र गोरे,अविनाश चव्हाण,रघुवीर गुढे,सोपान तिरुखे,ज्ञानदेव इंगोले,वासिम पठाण,भागवत घाटे,कलीम खान,कल्याण तारडे आदी मान्यवर उपस्थित होते.