जालना - स्थानिक गुन्हे शाखेने मानवी आरोग्यास घातक आणि प्रतिबंधित असलेल्या गुंगीकारक 'बटन गोळ्यांचा' (Alprazolam) पुरवठा करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी चार जणांना
अटक करून त्यांच्याकडून १ लाख ९८ हजार रुपये किमतीच्या ६ हजार ६०० गोळ्यांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयाने १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्ह्यात प्रतिबंधित औषधांची अवैध विक्री रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, जालना शहरातील लक्कडकोट परिसरात बेकायदेशीरपणे नशेच्या गोळ्या बाळगणाऱ्या जफर अहमद खान मंजुर अहमद खान (७५, रा. बीड) यास पोलिसांनी सर्वप्रथम ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाचा परीघ वाढवत पोलिसांनी या रॅकेटचे धागेदोरे शोधून काढले. या गोळ्यांचा मुख्य पुरवठा करणारी साखळी उघडकीस आणत पोलिसांनी सय्यद युसुफ अली (रा. रांजणी, ता. घनसावंगी), शिवप्रसाद संतोष बडदमकर आणि शेख अलीम शेख ईस्माईल (दोघे रा. परभणी) या अन्य तीन जणांना परभणी शहरातून ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने या चारही जणांना अटक करण्यात आली. या संपूर्ण टोळीला गोळ्या नेमक्या कोणी उपलब्ध करून दिल्या, याचा सखोल तपास सध्या पोलीस पथकाकडून सुरू आहे. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. दरम्यान, जालना पोलिसांनी चालू वर्षात (२०२६) अंमली पदार्थांचे सेवन करणे आणि बाळगणे यांसारख्या गंभीर गुन्ह्याखाली तब्बल ३८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. प्रतिबंधित औषधविक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून सातत्याने कठोर कारवाई केली जात असल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.