जालना - वाढत्या गुन्हेगारीमुळे व्यापारी वर्ग हादरला

सुरक्षेच्या मागणीसाठी आक्रमक होत व्यापाऱ्यांनी पुकारला आंदोलनाचा इशारा

Jalna Nayak    28-Aug-2026
Total Views |
 
व्यापारी वर्गात आणि नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण
 
जालना : शहरात वाढत्या खून, लूटमार, दरोडे आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात आणि नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापारी संकुलात दिवसाढवळ्या घडणाऱ्या खुनाच्या थरारक घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांचा व कायद्याचा धाक उरलेला नाही, असा संतप्त सूर व्यापाऱ्यांच्या बैठकीत उमटला. स्व. रामभाऊ राऊत पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित या महत्त्वपूर्ण बैठकीत व्यापाऱ्यांनी आपल्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त करत प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बैठकीत मनोगत व्यक्त करताना व्यापारी म्हणाले की, नवीन मोंढा व व्यापारी संकुल परिसरात गुंडागर्दी आणि दादागिरी करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. एका दुकानासमोर घडलेली खुनाची घटना इतकी भीषण होती की, ते दृश्य पाहून दुकानातील ग्राहक, महिला, पुरुष आणि व्यापारी वर्ग अत्यंत हादरले. मध्यस्थी करण्यास गेलेल्यांना हल्लेखोरांनी “तुम्ही मध्ये येऊ नका, नाहीतर तुमचाही नंबर लागेल,” अशी धमकी दिली. या थरारक प्रकरणाने ‘हे तर बिहार झाले आहे,’ अशी पहिली प्रतिक्रिया लोकांच्या मुखातून आली. या घटनेनंतर संध्याकाळपर्यंत दुकानांत एकही ग्राहक फिरकला नाही. व्यापारी मार्केटमध्ये बहुतांश ग्राहक रोख रक्कम (कॅश) घेऊन येतात. मात्र, वारंवार घडणाऱ्या खुनाच्या व दरोड्याच्या घटनांमुळे ग्राहक आणि दुकानदारांमध्ये मोठी भीती पसरली आहे. नव्या मोंढ्यात त्रास दिवसेंदिवस वाढत असून कॅश घेऊन येणे-जाणे अवघड झाले आहे. येथील पोलीस चौकी केवळ नावालाच असून तिथे पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी राहत नाहीत. सुरक्षेचा अभाव असल्यामुळे आता व्यापारी आणि शेतकरी त्रस्त झाले असून अनेकजण आपला शेतमाल राजूर किंवा जाफराबाद येथे विक्रीसाठी नेत आहेत, अशी व्यथा व्यापाऱ्यांनी मांडली.बापू शेठ जैन यांनी चंदनझिरा येथील घटनेपेक्षाही भर बाजारात घडलेल्या या घटनेने मोठी दहशत निर्माण केल्याचे सांगितले. मोहन इंगळे यांनी, कायद्याचा आणि न्यायव्यवस्थेचा धाक उरला नसल्याची खंत व्यक्त केली. खटले चालवून न्यायालयात लवकर निर्णय लागला पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे, मात्र खून करणारे आरोपी तीन महिन्यांतच सुटून येत असल्यामुळे गुन्हेगारांचे धाडस वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
महेश ज्वेलर्सचे महेश दुसाने, जिल्हा ग्राहक मंचचे मोहन इंगळे आदींनी तीव्र भावना व्यक्त करत व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीतरी उपाययोजना करण्याची मागणी केली. उदय शिंदे यांनी खुनाच्या घटनांमागे नशा हेच मुख्य कारण असल्याचे सांगितले. दिवसा दारू पिऊन धिंगाणा घालणारे आणि गुन्हे करणारे बहुतांश तरुण १८ ते २० वयोगटातील आहेत. ड्रग्स आणि नशिल्या पदार्थांची सहज उपलब्धता ही चिंतेची बाब बनली आहे.प्राचार्य जवाहर काबरा यांनी तरुणांमधील वाढत्या आक्रमकतेवर बोट ठेवले. पोलीस प्रशासन अधिक सक्षम आणि न्यायव्यवस्था कठोर झाली पाहिजे, असे ते म्हणाले.गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणीसंजय दाड यांनी पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेवर (खबऱ्यांवर) प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महानगरपालिकेने तातडीने बैठक घेऊन तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा आणि मोहल्ला समितीच्या माध्यमातून लहान वाद मोठे होण्यापूर्वी मिटवावे, अशी सूचना त्यांनी केली. तसेच सध्या सण-उत्सव सुरू असल्यामुळे ताबडतोब बंद पुकारणे योग्य होणार नाही, परंतु परिस्थिती पाहता त्याशिवाय पर्यायही उरलेला नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत साहनी यांनी, "जालना सोने का पाळणा" या जुन्या ओळखी ऐवजी आता "खून का जालना" अशी ओळख तयार होत असल्याचे सांगत राजकीय नेत्यांवर ताशेरे ओढले. चाळीस वर्षांपासून राजकारणी तेच आहेत, त्यांना सर्व परिस्थिती माहीत असूनही अशा घटना का घडतात? असा सवाल त्यांनी केला. राजकीय पुढारी तरुणांना पैसे आणि इतर गोष्टी पुरवत असल्यामुळे तरुण गुन्हेगारीकडे वळत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर जालनापेक्षा आकाराने सात पटीने मोठे असूनही तिथे गुन्हेगारी इतकी वाढलेली नाही, मात्र जालना यात टॉपवर असल्याचे त्यांनी नमूद केले.बैठकीच्या शेवटी. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून गुन्हेगारीवर अंकुश न ठेवल्यास बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा देण्यात आला. सुरक्षेसाठी पोलिसांना निवेदन देऊन प्रथम एक दिवस बंद पाळत ताकीद देण्याचे आणि त्यानंतरही सुधारणा न झाल्यास बेमुदत बंद पुकारण्याचे ठरले. बैठकीच्या शेवटी सुरक्षा, सन्मान आणि समानता यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
उपमहापौर राजेश राऊत यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करताना सांगितले की, "आजच्या 'झेन झी' (Gen Z) युगात मुले जन्माला येत नाहीत, तर थेट 'बाप' जन्माला येत आहेत, इतकी मुले दादागिरी करत आहेत." जालना शहरात वाढलेली गुन्हेगारी आणि व्यापारी संकुलातील चोरी, लूटमार व खुनाच्या प्रकरणांची माहिती थेट गृहमंत्र्यांना निवेदनाद्वारे देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.