'संस्कृत' भाषेचे संवर्धन - काळाची गरज !

श्रावण पौर्णिमा हा दिवस राष्ट्रीय संस्कृत दिन म्हणून साजरा केला जातो

Jalna Nayak    28-Aug-2026
Total Views |
 
भारतवर्षाची मूळ भाषा संस्कृत आज दुर्मिळ होत चालली आहे
 
श्रावण पौर्णिमा हा दिवस राष्ट्रीय संस्कृत दिन म्हणून साजरा केला जातो याची अनेकांना कल्पनाही नाही. केंद्रीय विद्यालय संघटनेने त्रिभाषा सूत्रांतर्गत सर्व शाळांमध्ये इयत्ता सहावी आणि नववीच्या वर्गासाठी संस्कृत विषयाची किमान एक तुकडी ठेवणे अनिवार्य केले आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या या संस्थेने २९ मे रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार सर्व शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून तिसऱ्या भाषेचा पर्याय घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले होते. या तिसऱ्या भाषेत संस्कृत किंवा इतर कोणतीही प्रादेशिक किंवा राज्याची भाषा निवडता येईल. बदली होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांची सोय व्हावी म्हणून प्रत्येक शाळेत संस्कृतची किमान एक तुकडी असणे अनिवार्य करण्यात आले आहे.भारतवर्षाची मूळ भाषा संस्कृत आज दुर्मिळ होत चालली आहे, तर परकीय भाषा इंग्रजी आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे, याला भारताचे दुर्दैव नाही, तर काय म्हणावे ? संस्कृत ही सर्वांत प्राचीन भाषा असून भारतीय संस्कृतीची नाळ ज्या प्राचीन वेद उपनिषिदांमध्ये, महाकाव्यांमध्ये दडली आहे ते सर्वच संस्कृत भाषेत आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये ती उपासनेची भाषा असून या भाषेत अनेक सुभाषितेही आहेत. विख्यात व्याकरणतज्ञ महर्षि पाणिनी यांनी इ.स. पूर्व काळात, म्हणजे साधारण २४०० ते २५०० वर्षांपूर्वी या भाषेचे व्याकरण सिद्ध करून संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. त्यांना ‘तत्सम शब्द’ म्हणतात. संस्कृतमधूनच अन्य भारतीय भाषा जन्मल्या आहेत; म्हणूनच संस्कृत भाषेला ‘सर्व भाषांची जननी’ म्हणले जाते. या भाषेची खरी समृद्धी तिच्यामध्ये रचल्या गेलेल्या अथांग वाङ्मयात दडलेली आहे, ज्याचे मुख्य आधारस्तंभ म्हणजे वेद, उपनिषदे आणि पुराणे हे आहेत. जगातील सर्वांत प्राचीन वाङ्मय मानले जाणारे ‘वेद’ मानवाला निसर्गाचा आदर करायला आणि कर्तव्याचे पालन करायला शिकवतात. वेदांचे हेच कठीण तत्त्वज्ञान सोपे करून ‘उपनिषदां’मध्ये मांडले गेले आहे, जे व्यक्तीला आत्मज्ञान आणि विश्वाचे अंतिम सत्य शोधण्याचा वैचारिक अन् आध्यात्मिक मार्ग दाखवतात, तर दुसरीकडे ‘पुराणे’ ही सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत रंजक आणि सोप्या भाषेत कथांच्या माध्यमातून सदाचार, इतिहास आणि नैतिक मूल्यांची शिकवण देतात. संस्कृत भाषेतील हा अमूल्य ज्ञानकोश केवळ धार्मिक नसून मानवी जीवनाला वैचारिक समृद्धी आणि जगण्याचा वैज्ञानिक दृष्टीकोन देणारा एक जागतिक वारसा आहे. रामायण, महाभारत, किरातार्जुनीयम्, मेघदूत अशी अनेक काव्ये, महाकाव्य या भाषेला समृद्ध बनवतात. ‘रामायण’ हे सर्वांत प्रथम लिहिलेले काव्य असल्याने त्याला ‘आदिकाव्य’ असेही म्हणतात, तसेच आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र आणि योग यांवरील प्राचीन वैज्ञानिक साहित्य संस्कृत भाषेमध्येच उपलब्ध आहे. संस्कृत ही भारताची मूळ भाषा असल्याने तिचे संवर्धन करण्याची गरज असताना तिला आज जाणीवपूर्वक डावलले जात आहे. आजमितीला इंग्रजी माध्यम आणि कॉन्व्हेंट शाळांचे स्तोम भारतात सर्वत्र माजले आहे. मराठी माध्यमांतही पहिली पासून इंग्रजी सक्तीची करण्यात आली आहे. तर दुसरीकडे संस्कृतला पर्यायी भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. ही पर्यायी भाषा सुद्धा फारच कमी शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकवली जाते. त्यामुळे संस्कृत भाषा शिकण्याची आवड असूनही शाळा महाविद्यालयांत ती शिकवणे व्यवस्थापनाच्या धोरणात नसल्याने विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव अन्य उपलब्ध भाषा शिकाव्या लागतात. अनेक महाविद्यालयांत तर फ्रेंच, जर्मन, डच यांसारख्या परकीय भाषा शिकवल्या जातात; मात्र संस्कृत शिकवण्यासाठी शिक्षक भरती केले जात नाहीत. आज अनेक शाळांमध्ये शाळा भरताना सुरुवातीला संस्कृत भाषेतील श्लोक आणि प्रार्थना घेतल्या जातात; मात्र विद्यार्थ्यांना त्यांचा नीटसा अर्थच कळात नसल्याने ते म्हणताना केवळ पाठांतर केल्याप्रमाणे म्हटले जाते. इंटरनेटच्या मुक्त वापरामुळे आणि इंग्रजी शिक्षणाच्या प्रभावामुळे पाश्चिमात्य संस्कृतीची छाप आज भारतीयांवर मोठ्या प्रमाणात जाणवते. मागील काही वर्षांत उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी ‘महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी’ला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला गेला, तर दुसरीकडे संस्कृतच्या पुरस्कारांची मात्र २ लाख रुपयांमध्ये बोळवण करण्यात आल्याचे वृत्त हल्लीच वाचनात आले. सरकारच जर संस्कृत भाषेला समृद्ध करण्याच्या संदर्भात उदासीन असेल तर अपेक्षा तरी कोणाकडून करायची ? भारतीय संस्कृतीला तिचे पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर किमान इयत्ता पाचवीपासून सर्व माध्यमांच्या शाळांतून संस्कृत विषय सक्तीचा करण्यातची गरज आहे त्यासाठी संस्कृत प्रेमी जनतेने सरकारवर दबाव आणायला हवा !
जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई