
डॉ. भताने'ज छाया फाउंडेशनच्या पुढाकारातून जालना पोलीस दलासाठी सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
जालना |
डॉ. गोविंद भताने यांच्या संकल्पनेतून व डॉ. भताने'ज छाया फाउंडेशनच्या पुढाकाराने जालना पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक बहुविशेषज्ञ आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमास जालना हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदीप हुशे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विविध शाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभागी होत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले.
या आरोग्य शिबिराची सुरुवात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. आरोग्य आणि पर्यावरण यांचा अतूट संबंध अधोरेखित करत या उपक्रमातून समाजात पर्यावरण संरक्षणाचा सकारात्मक संदेश देण्यात आला.
या शिबिराला जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. तेघबीर सिंह संधू (IPS), अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. विक्रांत साळी तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी मा. श्री. अनंत कुलकर्णी यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. पोलीस दलाच्या आरोग्य संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिबिरामध्ये दंतचिकित्सा, सामान्य औषधोपचार, हृदयरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, अस्थीरोग, मूत्रपिंड विकार व मानसोपचार अशा विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. यावेळी दंतचिकित्सा विभागातून डॉ. गोविंद भताने व डॉ. अभिसारिका भताने, नेत्ररोग विभागातून डॉ. पियुष सोमाणी व डॉ. श्रीलेखा बोरिवाले, हृदयरोग विभागातून डॉ. एकनाथ सानप, डॉ. शिल्पा देशमुख, डॉ. रामेश्वर सानप व डॉ. भूते, सामान्य औषधोपचार विभागातून डॉ. प्रदीप हुशे, डॉ. संकेत नागरे व डॉ. अमोल खावणे, स्त्रीरोग व प्रसूती विभागातून डॉ. अंजली हुशे व डॉ. प्रशांत कनडे, अस्थीरोग विभागातून डॉ. अमोल साळवे, मूत्रपिंड विकार विभागातून डॉ. संदीप देशमुख व डॉ. शालिक जाधव तसेच मानसोपचार विभागातून डॉ. सुरज सेठिया यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन केले. मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी डॉ. गोविंद भताने यांनी सांगितले की, "समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या पोलीस दलाचे आरोग्य जपणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. भविष्यातही डॉ. भताने'ज छाया फाउंडेशनच्या माध्यमातून अशा लोकहिताच्या आरोग्यसेवा सातत्याने राबविण्यात येतील."
या यशस्वी उपक्रमासाठी डॉ. गोविंद भताने यांनी पोलीस अधीक्षक मा. श्री. तेघबीर सिंह संधू (IPS), अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. विक्रांत साळी, पोलीस उपविभागीय अधिकारी मा. श्री. अनंत कुलकर्णी तसेच जालना हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रदीप हुशे आणि सर्व तज्ज्ञ डॉक्टरांचे आभार मानले.
या शिबिराच्या तयारी व व्यवस्थापन प्रक्रियेत पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक उदावंत, राखीव पोलीस निरीक्षक भाऊसाहेब वाघ व लोकल क्राईम ब्रांचचे श्री. संजय सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले.
"निरोगी पोलीस दल – सुरक्षित समाज" हा संदेश देणारे हे शिबिर सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अत्यंत यशस्वी ठरले.