जीवात जीव असेपर्यंत समाजासाठी लढणार- जरांगे

आमरण उपोषणाचा दुसरा दिवस विविध आक्रमक घडामोडींनी गाजला

Jalna Nayak    30-Aug-2026
Total Views |
 
१२ सप्टेंबरनंतर मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली.
 
वडीगोद्री : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस विविध आक्रमक घडामोडींनी गाजला. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. हे त्यांचे मराठा आरक्षणासाठीचे अकरावे उपोषण असून, सरकारकडून कोणतीही अपेक्षा उरली नसल्याचे सांगत त्यांनी १२ सप्टेंबरनंतर मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली.
जीवात जीव असेपर्यंत समाजासाठी लढणार,’ असे स्पष्ट करत जरांगे यांनी चर्चेची दारे आता जवळपास बंद झाल्याचे संकेत दिले आहेत. सरकारने रद्द केलेली प्रमाणपत्रे जोपर्यंत परत दिली जात नाहीत, तोपर्यंत नेत्यांनी मराठवाड्यात येऊ नये, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. मुंबईच्या सीमा कितीही सील केल्या तरी मराठे मुंबईत शिरणारच, असा इशारा देत त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी १२ सप्टेंबरची तारीख महत्त्वाची असल्याचे सांगितले. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
परभणीत उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमावरून जरांगे यांनी खासदार बंडू जाधव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कार्यक्रम तात्काळ रद्द करा, अन्यथा परभणीत येऊन तो उधळून लावून, असा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, प्रशासनाकडून परभणी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर आणि प्रवासाला वेळ अधिक लागल्याने, तिथे जाऊन ताकद वाया घालवण्याऐवजी मुंबईतील आंदोलनासाठी ती राखून ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ‘या आव्हानाची परतफेड मुंबईच्या आंदोलनात केली जाईल,’ असा इशारा त्यांनी सरकारला दिला.या उपोषणाला राजकीय नेत्यांचा आणि विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जालन्याचे काँग्रेस खासदार कल्याण काळे आणि बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार संदीप क्षीरसागर यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेतली आणि पाठिंबा दर्शवला. तसेच यशवंत संघर्ष सेनेच्या वतीने धनगर समाजबांधवांनी पारंपरिक पद्धतीने काठी आणि घोंगडी भेट देत जरांगे यांचा सत्कार केला. राज्यभरातून आंदोलक अंतरवाली सराटीत दाखल होत असल्याने उपोषणस्थळी मोठी गर्दी जमली आहे.मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यशवंत संघर्ष सेनेनेही पाठिंबा जाहीर केला. संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अंतरवाली सराटी येथे दाखल झाले.