जालना : भक्ती ज्ञान गंगा श्रीमद्भागवत कथा समितीच्यावतीने २० ते २६ सप्टेंबर या कालावधीत जालन्यातील मंठा रोडवरील आई साहेब लॉनमध्ये आयोजित करण्यात प. पू. श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या श्रीमद्भागवत कथेच्या पूर्वतयारी व यशस्वी नियोजनासाठी रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी वाजता महेश भवन येथे सकल हिंदू समाजाची एक भव्य व ऐतिहासिक संयुक्त बैठक उत्साहात संपन्न झाली. त्यात विविध समाजांनी सेवांची जबाबदारी स्वीकारत धर्म जागरण, संस्कार निर्मिती आणि हिंदू एकतेचा संकल्प केला.
या बैठकीत मराठा समाज, अग्रवाल समाज, माहेश्वरी समाज, दायमा समाज, ब्राह्मण समाज, सिंधी समाज, गुजराती समाज, माळी समाज, बौद्ध समाज, जैन समाज, श्रीमाळी समाज, वारकरी समाज, राजपूत समाज, गौड समाज, तेली समाज, विप्र समाज तसेच अहिर-गवळी समाजासह जालन्यातील विविध सामाजिक व धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला.या बैठकीस आर.पी. रोडवरील राम मंदिराचे प. पू. मनोज महाराज गौड आणि जुना जालना राम मंदिराचे प. पू. रामदासी महाराज प्रमुख अतिथी व आशीर्वचनकर्ते म्हणून उपस्थित होते. आपल्या आशीर्वचनात दोन्ही संतांनी हिंदू समाजाच्या एकतेवर भर देत सांगितले की, ही कथा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून संपूर्ण हिंदू समाजाला एका सूत्रात बांधण्याची एक दिव्य संधी आहे. सर्व समाजाने जात, पंथ आणि संघटनांच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन एक हिंदू म्हणून या महायज्ञात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आपण आधी हिंदू आहोत, नंतर समाज-अभय कुलकर्णी : प्रास्ताविकात अभय कुलकर्णी म्हणाले की, प्रत्येक समाजाची स्वतःची सामाजिक ओळख, परंपरा आणि संघटना असते आणि त्याचा सार्थ अभिमान सर्वांना असावा. परंतु, जेव्हा हिंदू समाजाच्या एकतेचा प्रश्न येतो, तेव्हा या सर्व मर्यादा ओलांडून एकत्र येणे काळाची गरज आहे. आपण आधी हिंदू आहोत, त्यानंतर आपापल्या समाजाचे घटक आहोत. ही कथा कोणत्याही एका समाजाची किंवा संस्थेची नसून संपूर्ण जालना हिंदू समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. या आयोजनात कोणालाही पैशांची विचारणा केली जाणार नसून, तुम्ही कोणती सेवा सांभाळणार? हे विचारले जाईल. त्यांनी पादत्राणे व्यवस्था, पेयजल, प्रसाद वितरण, वाहनतळ (पार्किंग), स्वच्छता, स्वयंसेवक व्यवस्था, वैद्यकीय समन्वय, प्रचार-प्रसार, महिला सेवा, ज्येष्ठ नागरिक सेवा आणि युवा सेवा अशा विविध जबाबदाऱ्या स्वीकारण्याचे आवाहन सर्व समाजांना केले. या आयोजनाची खरी जबाबदारी येणाऱ्या पिढीला घडवण्याची आहे. संपूर्ण कुटुंबाने (मुलं, तरुण, पालक आणि ज्येष्ठ नागरिक) या कथेत सहभागी व्हावे. कुटुंब मजबूत झाले तर समाज मजबूत होईल आणि समाज मजबूत झाला तर राष्ट्र बलशाली होईल. तरुणांनी केवळ प्रेक्षक न राहता सेवा आणि नेतृत्वाची धुरा हाती घ्यावी.
धर्म जागरण व हिंदू एकतेचा* *महायज्ञ-विष्णुकुमार चेचानी : कथेचा मुख्य संकल्प आणि उद्देश विशद करताना मुख्य यजमान विष्णुकुमार चेचानी म्हणाले की, २०१७ नंतर प.पू. श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या कथेचा योग जालन्याला मिळणे हे अत्यंत भाग्याचे आहे. ही कथा म्हणजे केवळ भागवत श्रवण नसून धर्म जागरण, संस्कार निर्मिती, हिंदू एकता, सामाजिक समरसता आणि राष्ट्र चेतनेचा महायज्ञ आहे. आज जालन्यात साधनांची कमतरता नाही, गरज आहे ती समाजाच्या एकतेची, सहभागाची आणि समर्पणाची, असे ते म्हणाले.

या प्रसंगी मुख्य यजमान श्री. चेचानी यांनी सप्तदिवसीय दैनिक कथा यजमान म्हणून घनश्यामदास गोयल,अरुण अग्रवाल, समीर अग्रवाल, सीए नितीन तोतला, कैलाश लोया,शिवरतन मुंदडा, राजेश सोनी, श्रीकृष्ण जन्मोत्सव यजमान म्हणून विजयजी बद्रीनारायण राठी, ५६ भोग यजमान म्हणून अशोक झंवर,रुक्मिणी विवाह यजमान म्हणून रामनिवास मानधानी यांच्या नावाची घोषणा केली. उमेश बजाज यांनी कथेच्या विविध सेवा विभागांची आणि व्यवस्थांची सविस्तर माहिती दिली. यानंतर सर्व समाज प्रतिनिधींनी आपापल्या वतीने पूर्ण सहकार्य व सक्रिय सहभागाचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन जोशी यांनी केले तर शेवटी उपस्थित सर्व संत-महंत, समाज प्रतिनिधी, पाहुणे आणि कार्यकर्त्यांचे आभार रामजी उपाध्याय यांनी मानले. या बैठकीत सर्वानुमते असा निर्धार करण्यात आला की, ही श्रीमद्भागवत कथा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता हिंदू एकता, सामाजिक समरसता, राष्ट्रभक्ती आणि सनातन संस्कृतीच्या जागरणाचा एक विराट उत्सव ठरेल.