अंतरवाली हाऊस फुल

मनोज जरांगे यांचे दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच राज्यभरातून मराठा बांधवांची उपस्थिती

Jalna Nayak    30-Aug-2026
Total Views |

अंतरवाली सराटीत कार्यकर्ते व समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
जालनाः मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे तात्काळ देण्यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्ट रोजी उपोषणाला सुरूवात केली. पहिल्या दिवसापासून अंतरवाली सराटीत कार्यकर्ते व समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने संपूर्ण राज्यभरातून आलेल्या समर्थक व मराठा समाजामुळे अंतरवाली सराटी हाऊस फुल झाल्याचे चित्र दिसून आले. रविवारी जरांगे यांच्या उपोषणचा दुसरा दिवस होता. अनेक ठिकाणी वाहनांची कोंडी झाली होती. उपोषणस्थळी येणाऱ्या हजारो मराठाबांधवांना समाजातील दानशूर तसेच गावनिहाय पदाधिकाऱ्यांकडून जेवणाची व्यवस्था केली जात आहे.
दुसऱ्या दिवशीही जरांगे यांनी जात पडताळणी समिती असो इतसेच इतर राजकीय व अराजकीय मुद्द्यांवरून जोरदार टीकास्त्र सोडले. मराठ्यांना जाणून बाजून डावलले जात असल्याची खदखद व्यक्त करून आगामी काळात मराठ्यांच्या मागण्यांचा विचार न झाल्यास मुंबई गाठून जाब विचारणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला. रविवारी दिवसभरात अनेक लोकप्रतिनिधी, उद्योजक तसेच इतरांनी उपोषणस्थळी भेट देऊन जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.