-(1)_202608312008473741_H@@IGHT_982_W@@IDTH_1800.jpeg)
महिला सक्षमीकरण, कायदा, समाजसेवा आणि अध्यात्म या सर्वच क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या जालना येथील ॲड. सौ. अर्चना नितीन तोतला यांचा जीवनप्रवास म्हणजे जिद्द, चिकाटी आणि सेवाभावाचे उत्तम उदाहरण आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत वयाच्या एका टप्प्यानंतरही शिक्षणाची आवड जपत त्यांनी मिळवलेले यश आणि त्यानंतर समाजसेवेसाठी वाहून घेतलेले आयुष्य खरोखरच प्रेरणादायी आहे.संस्कारांची शिदोरी आणि शिक्षणाची जिद्द परभणी येथे जन्मलेल्या आणि नांदेडच्या प्रतिथयश भागीरथजी व सुशीलाजी मुंदडा यांच्या संस्कारांवर वाढलेल्या ॲड. अर्चना यांनी शालेय जीवनापासूनच आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली होती. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत (मेरिट लिस्ट) स्थान मिळवणाऱ्या त्यांनी बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. जालना येथील प्रसिद्ध सीए डॉ. नितीनकुमार तोतला यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी संसाराची धुरा अतिशय समर्थपणे सांभाळली. लग्नानंतर तब्बल १० वर्षांनी, शिक्षणाची आणि काहीतरी वेगळे करून दाखवण्याची त्यांची जिद्द पुन्हा जागी झाली. संसाराचा गाडा हाकत त्यांनी एलएल.बी. आणि एलएल.एम.चे शिक्षण पूर्ण केले आणि कायद्याच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. विशेष म्हणजे, आपल्या मुलांवरही त्यांनी उत्तम संस्कार घडवले; त्यांची मुलगी साक्षी सीए तर मुलगा श्रीनिवास सीए आणि एफआरएम झाले आहेत.कायदेविषयक मार्गदर्शन आणि महिला सक्षमीकरण केवळ स्वतःचे करिअर न करता त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य आणि विशेषतः महिलांच्या हितासाठी केला. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पावले टाकत त्यांनी ५० हून अधिक मोफत कायदेशीर सल्ले दिले. आंतरजातीय विवाह आणि कौटुंबिक समस्यांवर त्यांनी ४० हून अधिक मोफत समुपदेशन सत्रे घेतली. विशेष म्हणजे, घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या २५ हून अधिक कुटुंबांना समुपदेशनाद्वारे पुन्हा एकत्र आणून त्यांचे संसार सावरण्याचे मोठे पुण्यकर्म त्यांनी केले आहे. याशिवाय महिलांसाठी मार्गदर्शन शिबिरे, योगासने, प्राणायाम, ध्यान आणि वास्तुशास्त्रावर मोफत मार्गदर्शन करून त्यांनी महिलांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आहे.
समाजसेवा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील योगदान स्व. धोंडाबाई तोतला बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य अविरत सुरू असते:शिक्षण व मदत: ४७५ गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि ५५ पेक्षा अधिक गरजू रुग्णांना थेट आर्थिक मदत त्यांनी केली आहे. परतूरच्या दृष्टी नेत्रालयातील डायलिसिस उपक्रमासाठी ६.७२ लाख रुपयांचे मोठे सहकार्य केले आहे, तसेच गिरनार तांडा येथील जि.प. शाळेला डिजिटल स्मार्ट बोर्ड भेट दिला आहे.कोरोना काळातील योद्धा: कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी १७,००० भोजन किट्सचे वाटप केले, २५ मुलांना दत्तक घेतले आणि देवगड संस्थानातील ५१ कीर्तनकारांना किराणा किट्स वाटप करून ‘कोरोना योद्धा’ म्हणून बहुमान मिळवला.गोसेवा: घरच्या गोठ्यात ८ गोमातांची नित्यसेवा करून त्यांनी भारतीय संस्कृतीतील गोसेवेचा वसा जपला आहे. तसेच गरजू कन्यांच्या विवाहासाठी आपले ‘श्रीनिवासा लॉन्स खरपुडी’ हे मंगल कार्यालय विनामोफत उपलब्ध करून दिले आहे.आध्यात्मिक व सांस्कृतिक समृद्धी धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या शिष्या म्हणून त्या आळंदी येथील तुकाराम गाथा आणि गीता परिवारात सक्रिय कार्य करतात. मुलांसाठी विशेष गीता शिबिरांचे आयोजन करणे, तसेच चारधाम, १२ ज्योतिर्लिंगे, शक्तिपीठे, अष्टविनायकासह तिरुपती, शेगाव, बद्रीनाथ आणि द्वारका येथे जाणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची व निवासाची उत्तम सोय करण्याची त्यांची धडपड कौतुकास्पद आहे. माहेश्वरी महिला मंडळात गणगौर मिरवणूक, तीज उत्सव, सातु आटा, दांडिया आणि विविध व्याख्यानांचे आयोजन करून त्यांनी सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवल्या आहेत.
भविष्याची सुंदर दिशा: ‘कंपॅनियन हाऊस’ (सहजीवन घर) आजच्या धावपळीच्या युगात पाश्चिमात्य देशांप्रमाणेच भारतातही अनेक वृद्ध माता-पिता एकाकी जीवन जगत आहेत. अशा निराधार आणि एकाकी वृद्धांसाठी स्व. धोंडाबाई तोतला संस्थेमार्फत अत्यंत नाममात्र शुल्कात कौटुंबिक वातावरणासह ‘कंपॅनियन हाऊस’ (सहजीवन घर) उभारण्याचा त्यांचा मानस आहे, जो त्यांच्या संवेदनशील मनाची ओळख करून देतो.गौरव आणि प्रतिष्ठा त्यांच्या या निस्वार्थ आणि अष्टपैलू समाजकार्याची दखल घेत अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे. योगगुरू स्वामी रामदेवजी महाराज, प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, ब्रह्मकुमारी विश्व विद्यालय (जालना), जालना इंजिनिअरिंग असोसिएशन, ‘मारवाडी युवा मंचचा नारी रत्न पुरस्कार’ आणि महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेकडून त्यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवीन काहीतरी शिकत आणि समाजाला भरभरून देत राहणाऱ्या ॲड. सौ. अर्चना तोतला यांचा हा प्रवास खरोखरच समाजासाठी एक दीपस्तंभ आहे. तीजच्या या पवित्र पर्वावर त्यांच्या या महान कार्याला आणि त्यामागील त्यागाला मानाचा मुजरा!