मुंबईच्या दिशेने हळूहळू मार्गस्थ व्हा- जरांगे

मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार

Jalna Nayak    31-Aug-2026
Total Views |
 
मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्यावर जरांगे यांनी जोरदार निशाणा साधला.
वडीगोद्रीः मराठा आरक्षण आंदोलनाचे पुढचे रणशिंग फुंकत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजबांधवांना ५ ते ६ सप्टेंबरपासून मुंबईकडे हळूहळू रवाना होण्याचे आवाहन केले आहे. अंतरवाली सराटी येथे त्यांच्या आमरण उपोषणाचा सोमवारी तिसरा दिवस होता. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त करतानाच, १२ सप्टेंबरपर्यंत मुंबईत पोहोचण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. एकाच वेळी गर्दी न करता टप्प्याटप्प्याने प्रवास करण्याचे आणि मुंबईतील नातेवाईक वा मित्रांकडे आश्रय घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच आंदोलनादरम्यान थेट आझाद मैदानावर न जाण्याचे आणि पोलिसांनी ताब्यात घेतल्यास न घाबरता सहकार्य करण्याचे कडक निर्देशही त्यांनी दिले आहेत.यावेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्यावर जरांगे यांनी जोरदार निशाणा साधला. ५८ लाख नोंदींच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरत, "मराठ्यांच्या विरोधात गेल्यास राजकीय परिणाम भोगावे लागतील," असा सज्जड दम त्यांनी भरला. तसेच जात पडताळणीमुळे इतर आरक्षित घटकांचे नुकसान होत असल्याचा दावा करत छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. गणेशोत्सवावरून टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना, आपल्याला धर्म शिकवण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले.दुसरीकडे, उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणीदरम्यान रक्तातील साखरेच्या पातळीत झालेल्या वाढीवर जरांगे यांनी तीव्र शंका उपस्थित केली. आपल्या पोटात अन्नाचा कण गेल्यास जीव देईन, असे सांगत त्यांनी चुकीच्या अहवालांवर आक्षेप घेतला. यावर स्पष्टीकरण देताना डॉ. अमोल खवले यांनी, शरीरातील नैसर्गिक प्रक्रियेमुळे साखरेच्या पातळीत होणारी ही वाढ अत्यंत सामान्य असून ती चिंतेची बाब नाही, असे स्पष्ट करत जरांगे यांच्या शंकांचे निरसन केले. सध्या अंतरवाली सराटीतील वातावरण तापले असून, मराठा आंदोलनाची दिशा आता मुंबईच्या दिशेने वळू लागल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे.