जालना जिल्ह्यातील मंठ्याच्या नवीन बाजार संकुलाचा मार्ग मोकळा

ठेंगेवडगावची ३.९५ हेक्टर गायरान जमीन बाजार समितीला

Jalna Nayak    31-Aug-2026
Total Views |

 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.
 
जालना - जिल्ह्यातील मंठा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन बाजार संकुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून मौजे ठेंगेवडगाव येथील ३ हेक्टर ९५ आर शासकीय गायरान जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती, मंठा यांना देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.
पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संबंधित जमीन बाजार समितीला देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. जिल्हाधिकारी, जालना यांनीही जमीन प्रदान करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार महसूल व वन विभागाने ही जमीन नाममात्र १ रुपया कब्जेहक्काची रक्कम आकारून ‘भोगवटादार वर्ग-२’ या धारणाधिकाराने बाजार समितीला देण्यास मान्यता दिली आहे. जमिनीचा वापर केवळ नवीन बाजार संकुल विकसित करण्यासाठीच करता येणार आहे. जमीन ताब्यात देण्यापूर्वी तिची मोजणी व हद्द निश्चित करण्यात येणार असून, बाजार संकुलाच्या विकासासाठी आवश्यक त्या सक्षम प्राधिकरणांच्या परवानग्या घेणे बंधनकारक राहणार आहे.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे याबाबत म्हणाले, “मंठा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी नवीन बाजार संकुल उभारण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी आणि कृषी व्यापाराशी संबंधित पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे हा शासनाचा सातत्याने प्रयत्न आहे. या निर्णयामुळे मंठा परिसरातील कृषी व्यापाराला आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधांच्या विकासाला गती मिळेल.