
जालना- महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगासह एमएचसीआयटी परीक्षा व टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज ( दि. ३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आली. या धरणे आंदोलनात विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या धरणे आंदोलनाचे नेतृत्व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे, प्रदेश प्रवक्ते प्रा. सुदर्शन तारक, विभागीय उपाध्यक्ष विजय वाडेकर, जिल्हाध्यक्ष कैलास खांडेभराड आदींनी केले.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रा मध्ये एमपीएससी पेपर फुटी एम एच टी सीईटी परीक्षा घोटाळा व शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात सरकारची भूमिका जनहिताची नाही. या परीक्षेतील निवड प्रक्रियेतील पर्सेंटाईल पद्धती चुकीची असून ग्रामीण व गुणवंत विद्यार्थ्यांना अन्यायकारक असून विशिष्ट वर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ही परीक्षा निर्माण केल्याचे मागील काही वर्षाच्या निकालवरून लक्षात येते.तसेच परीक्षामध्ये सातत्याने घोटाळे सुरू आहेत.अनेक परीक्षांचे पेपर सुद्धा फुटलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
मुळात कोणतीच परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात घेणे न्याय नसून बेकायदेशीर आहे. एमएचटी सीईटी परीक्षा निकाल जाहीर करण्यासाठी वापरलेली पर्सेंटाइल (सामान्यीकरण) पद्धत ही विद्यार्थ्यांना समान संधी व न्याय देत नाही. ही पद्धत रद्द करण्यात यावी,या परीक्षा घोटाळ्याचा मुळापासून तपास करून दोषींना कडक शासन करावे व परीक्षा घेण्यासाठी नेमण्यात आलेली ही खाजगी अस्थापना सरकारने काढून टाकून ती स्वतःच्या नियंत्रणात घ्यावी तसेच पुढे कोणतीच परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार नाही असे आश्वासन द्यावे, सर्वोच्च न्यायालयाने गुणवत्ता वाढणे आवश्यक आहे असे सांगितले असताना महाराष्ट्र सरकार टीईटी परीक्षा अनिवार्य करून सर्व शिक्षक वर्गाची जाणीवपूर्वक पिळवणूक करत आहे,
टीईटी परीक्षा कायमस्वरूपी रद्द करावी.देशातील, राज्यातील सर्वं विद्यार्थ्यांना केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण सक्तीचे व मोफत करावे, जगाला आदर्श असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकात पुन्हा समाविष्ट करावा, सरकारने वरील मागण्या विषयात अत्यंत गांभीर्याने लक्ष घालावे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी व पीडित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ,अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली असून सरकारने जर ताबडतोब पाऊल उचलून दोषी व्यक्तींवर कारवाई केली नाही तर संभाजी ब्रिगेड आक्रमक आंदोलन करेल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या धरणे आंदोलनात ज्ञानदेव जगताप, दत्ताराव कपाळे, जगन्नाथ काळे, नारायण निंबाळकर, बाळासाहेब खवणे, पांडुरंग नवल, आसाराम झोल, दत्ताराव सरकटे, सुवर्णाताई राऊत, संजय हिवाळे, एकनाथ जाधव, राजेश काळे, अनिल राठोड तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते.