नागरिकांना केंद्र बिंदू ठेवून महसूल विभागाने काम करणे आवश्यक

-- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

Jalna Nayak    04-Aug-2026
Total Views |


Mahasuldin

 

 
जालना : महसूल विभागाने आपल्या प्रत्येक कामामध्ये नागरिकांना केंद्रबिंदू मानून पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख सेवा देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
 
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित महसुल दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, सहायक जिल्हाधिकारी आर रंगमंजु, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विक्रम साळी, उपजिल्हाधिकारी मनिषा देशपांडे, उप विभागीय अधिकारी रामदास दौंड, पद्माकर गायकवाड, उमाकांत पारधी, रामेश्वर रोडगे, जिल्हा नियोजन अधिकारी सूचित कुलकर्णी, तहसीदार – नायब तहसीदार संघटनेचे अध्यक्ष रमेश पागोटे, राज्य सरकार कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष पी.बी. मते, महसुल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष संदीप नरुटे, लघुलेखक संघटनेचे अध्यक्ष योगेश वाघ, वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष योगेश कुरेवाड, महसुल चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शाम विभुते, महसुल सेवक संघटनेचे अध्यक्ष संदीप धारे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अर्जून ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या की, महसुल विभाग कोणतीही समस्या किंवा परिस्थितीमध्ये आपले कर्तव्य पार पाडण्याकरीता सदैव उभा राहतो. महसूल विभाग हा शासनाच्या प्रशासनाचा कणा असून नागरिकांना विविध शासकीय सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात या विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मागील एक वर्षात महसुल विभागाने पुर परिस्थिती यशस्वीपणे हाताळली, पारदर्शकपणे पोलीस पाटील भरती प्रक्रिया पार पाडली, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, विविध निवडणूका, जनगणना, एसआयआर आदी कामे यशस्वीपणे पार पाडली. याकरीता मी सर्व महसुल अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करते. सद्यपरिस्थितीत आपले काम वाढलेले आहे. परंतु आपण आपले कुटूंब आणि काम यामध्ये समतोल राखुन कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. यापुढेही आपण चांगले काम करु.
यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ म्हणाले की, महसूल विभाग केवळ जमीन व महसुलाशी संबंधित कामकाजापुरता मर्यादित नसून आपत्ती व्यवस्थापन, निवडणुका, नैसर्गिक संकटांतील मदत, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, तसेच नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडतो. महसूल विभागाने संवेदनशीलता, पारदर्शकता या तत्त्वांवर काम करून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी कटिबद्ध रहावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी राजेंद्र शिंदे, महेंद्र गिरगे यांनी भाषण तसेच उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांनी समायोचित मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी, महसुल विभागाने मागील एक वर्षात पार पाडलेल्या विविध उल्लेखनीय कामाचे सादरीकरण करुन महसुल दिनाचे महत्व सांगितले.
यावेळी कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महसूल विभागाच्या कार्याचा आढावा घेऊन सेवा वितरण अधिक परिणामकारक करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.