
समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजलगत निसर्ग पर्यटनाला चालना; व्ह्यू पॉइंटवरून मनमोहक दृश्यांचा आनंदजालना: काही वर्षांपूर्वी विरळ वनस्पती असलेली जालना शहरालगतची पारशी टेकडी आज हिरवाईने नटली असून, 'अमृत वाटिका' उपक्रमामुळे या परिसराचे रूपच पालटले आहे. सातत्याने राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेचे यंदाच्या पावसाळ्यात उत्साहवर्धक चित्र पाहायला मिळत आहे. टेकडीवर लावलेली देशी जातींची झाडे बहरली असून, संपूर्ण परिसराने हिरवागार साज चढविला आहे.
पारशी टेकडीवर पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये आंब्याची, जांभळाची तसेच साग आणि इतर अनेक देशी प्रजातींची शेकडो झाडे लावण्यात आली आहेत. योग्य देखभाल आणि यंदाच्या मुबलक पावसामुळे ही झाडे आता जोमाने वाढली असून, टेकडीवर दाट हिरवाई निर्माण झाली आहे.
शहरातील वाढते नागरीकरण, औयोगिकीकरण आणि यामुळे होणारे प्रदूषण लक्षात घेता पारशी टेकडीवरील ही हरित चळवळ पर्यावरणासाठी दिलासादायक ठरत आहे. या वनराईमुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होत असून, पक्षी आणि जैवविविधतेलाही नैसर्गिक अधिवास मिळत आहे. त्यामुळे पारशी टेकडी जालना शहरासाठी 'हरित फुफ्फुस' म्हणून विकसित होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पारशी टेकडीच्या लगतच समृद्धी महामार्गाचा इंटरचेंज असल्याने या परिसराचे पर्यटनदृष्ट्याही महत्त्व वाढले आहे. टेकडीवरील विविध व्ह्यू पॉइंटवरून जालना शहर, सभोवतालचा हिरवागार परिसर आणि दूरवर पसरलेला निसर्ग एका नजरेत अनुभवता येतो. पावसाळ्यात तर धुक्याची चादर, हिरवाई आणि आल्हाददायक वातावरणामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना वेगळाच अनुभव मिळत आहे.
पर्यावरण संरक्षण, निसर्ग संवर्धन आणि पर्यटन विकासाचा सुंदर संगम घडवून आणणारी पारशी टेकडी आज जालन्याच्या नव्या हरित ओळखीचे प्रतीक ठरत आहे. या वृक्षसंपदेचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेतल्यास, भविष्यात पारशी टेकडी मराठवाड्यातील एक आदर्श निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते.