जोरदार पाऊस होताच भोकरदन वजाफ्राबाद तालुक्यातील टँकर झाले बंद

बदनापूर, जालना, अंबड व घनसावंगी तालुक्यात टँकर सुरूच

Jalna Nayak    04-Aug-2026
Total Views |
जालना - चार महिन्यापासून टँकरभरोसे असलेल्या भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यात चार दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद करण्यात आले असून बदनापूर, जालना, अंबड व घनसावंगी तालुक्यात भरपावसाळ्यातही टँकरने पाणी पुरवठा सुरूच आहे.

जालना जिल्ह्यातील परतूर व मंठा तालुका वगळता यंदा जालना जिल्ह्यातील सहाही तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली होती. बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद व जालना तालुक्यात एप्रिल महिन्यापासून पाणी टंचाई निर्माण झाली होती. यंदा टंचाईग्रस्त गावासह टँकरने शतक झळकावले होते. जून महिन्यात जेमतेम पाऊस झाल्याने व पाणी टंचाई कायम असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावासह वाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरला मुदतवाढ दिली होती.

३० जुलै रोजी जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. भोकरदन तालुक्यासह जाफ्राबाद तालुक्यात अतिवृष्टी झाली. भोकरदन तालुक्यातील जुई, धामना, व जाफ्राबाद तालुक्यातील जीवरेखा या धरण क्षेत्रात ३० जुलै रोजी जोरदार पाऊस झाल्यानंतर तसेच नदी व ओढ्यांना पूर गेल्याने या दोन तालुक्यातील पाणी टंचाई दूर झाल्याने टंचाईग्रस्त गावांतील पिण्याच्या पाण्याचे टँकर आता बंद झाले आहेत.

आजमितीस जालना तालुक्यातील २ गावांना ४ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. बदनापूर तालुक्यातील १८ गावे व २१ वाड्यांना २८ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. अंबड तास ८ गावांना १० टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.घनसावंगी तालुक्यातील १ गाव व ४ वाड्यांना २ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील २९ गावे व २५ वाड्यांना ४४ टँकरने पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.