
जालनाः जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये अध्यक्षपदी राहुल लोणीकर तर उपाध्यक्ष म्हणून निर्मला मरकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहामध्ये ही निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री तथा आ.अर्जुनराव खोतकर, आ.बबनराव लोणीकर, आ.नारायण कुचे, आ.संतोष दानवे, माजीमंत्री राजेश टोपे, माजी आ.अरविंदराव चव्हाण यांच्यासह मावळते अध्यक्ष सतीश टोपे, राष्वादी काँग्रेसचे नेते रवींद्र तौर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी राहुल लोणीकर आणि निर्मला मरकड यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच बँक आता तरूण नेतृत्वाच्या हातात आली आहे. त्यामुळे बँकेला निश्चितच चांगले दिवस येऊन आर्थिक प्रगती होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. यावेळी राजकीय टोलेबाजी जोरात झाली. कार्यक्रमास बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष देशमुख यांच्यासह बँकेतील अन्य वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चौकट
बबनराव लोणीकरांची खासदारकीची इच्छा
मध्यवर्ती बँकेच्या सत्कार समारंभात आ.बबनराव लोणीकर यांनी निवृत्तीच्या मुद्यावरून चांगलेच हास्य पिकवले. आजघडीला ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे, अर्जुनराव खोतकर आणि मी स्वतःआता सक्रीय राजकारणातून दूर व्हावे असे वाटते. परंतु हे जरी वाटत असले तरी आपण विधानसभा निवडणुकी ऐवजी आता एकदा परभणी लोकसभा मतदार संघातून खासदारकीची निवडणुक लढविण्याची इच्छा असल्याचे ते म्हणाले. तर रावसाहेब दानवे यांना आता त्यांच्या ज्येष्ठतेनुसार राज्यपाल करावे अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची आठवणही करून दिली.