विशाल अस्वार
वालसावंगी: पेशाने शिक्षक असले तरी मनापासून अस्सल चित्रकार असलेल्या वालसावंगी (ता. भोकरदन)येथील भूमिपुत्र व जिल्हा परिषद प्रशाला, भाभुळगावचे कलाशिक्षक सुभाष पवार यांनी आपल्या अप्रतिम कुंचल्याच्या साहाय्याने चित्रकला क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या सुप्त गुणांमुळे आणि कलाकृतींमुळे संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
वालसावंगी येथील एका सर्वसामान्य गरीब कुटुंबात जन्मलेल्या सुभाष पवार यांना चित्रकलेचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांचे मोठे बंधू मुरलीधर पवार हेदेखील ख्यातनाम चित्रकार असल्याने त्यांना लहानपणापासूनच कलेचे वातावरण लाभले. त्यांचे अन्य दोन भावंडेही चित्रकला क्षेत्रात कार्यरत आहेत. वालसावंगी येथील जि.प. शाळेत बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जालना येथील फाऊंडेशनमधून कला शिक्षणाचा पाया मजबूत केला, तर बुलढाणा येथील सुवर्ण चित्रकला महाविद्यालयातून ‘एटीडी’ (ATD) चे शिक्षण पूर्ण केले.
सुभाष पवार यांनी आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत हजारो चित्रे रेखाटली आहेत. विशेषतः, अजिंठा लेण्यांमधील भित्तिचित्रकलेचा त्यांनी सखोल अभ्यास केला असून, तिथल्या प्राचीन कलाकृतींच्या धर्तीवर अनेक हुबेहूब चित्रे साकारली आहेत. याशिवाय रामायण आणि महाभारतातील विविध पात्रे त्यांनी आपल्या ब्रशच्या ताकदीने जिवंत केली आहेत. आपल्या सुट्टीचा संपूर्ण दिवस ते अजिंठा लेण्यांच्या सानिध्यात घालवत असल्याने तिथली जिवंत कला त्यांनी आत्मसात केली आहे आणि याद्वारे ते अजिंठा संस्कृतीचा प्रसार करत आहेत.
‘पदमपाणी’ ठरले कौतुकाचे केंद्रबिंदू:
अजिंठा येथील एमटीडीसी (MTDC) हॉटेलमध्ये त्यांनी रेखाटलेल्या जागतिक प्रसिद्ध ‘पदमपाणी’ या बौद्ध सत्त्व चित्राने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. या उत्कृष्ट कलाकृतीची दखल घेत तत्कालीन महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे तसेच चीनच्या उपराष्ट्रपतींनीही त्यांच्या कलेची भरभरून प्रशंसा केली होती.
राज्यस्तरीय प्रदर्शन आणि मानमान्यता:
सुभाष पवार यांच्या कलागुणांना विविध राजस्तरीय व्यासपीठांवर दाद मिळाली आहे. श्लोक, मुंबई येथील नामांकित ‘काळाघोडा महोत्सव’, अजिंठा आणि पुणे येथील ‘आर्ट विथ फाऊंडेशन’च्या प्रदर्शनात त्यांच्या चित्रांची निवड होऊन ते गौरवान्वित झाले आहेत. भोकरदन आणि छत्रपती संभाजीनगर येथील बलवंत वाचनालयात त्यांच्या चित्रांचे स्वतंत्र प्रदर्शन भरले असून, अनेक कलाप्रेमींनी त्यांच्याकृती आवडीने खरेदी केल्या आहेत. स्व. प्रकाश ताबसकर, स्व. लकमबाई खोना, अशोक ताबसकर, भारत गर्दी, रवींद्र खोरपणे, धर्मराज भोईर, प्रभाकर कोलते, सुभाष यशवंत पवार, मुरलीधर लाहोटी आणि पंढरीनाथ खैरनार या दिग्गज मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी लाभले आहे.
भिंतींना दिली ‘बोलकी’ रूपे:
केवळ कागदावरच नव्हे, तर राहत्या घरच्या भिंतींवर, शाळेच्या भिंतींवर तसेच मंदिरांवर स्वतःहून सुंदर चित्रे काढून त्यांनी परिसरातील भिंती ‘बोलक्या’ केल्या आहेत.
विद्यार्थ्यांसाठी संदेश:
“लहानपणापासूनच मोठ्या भावाच्या प्रेरणेमुळे मला चित्रकलेची आवड लागली, जी मी आजतागायत जपली आहे. चित्रकला ही केवळ स्वतःलाच नाही, तर पाहणाऱ्यालाही आनंद देते. ताणतणाव कमी करणे, नव्या कल्पनांना वाव देणे, एकाग्रता, चिकाटी आणि उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचे सामर्थ्य चित्रकलेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने चित्रकला स्पर्धेत सहभागी व्हावे,” असे आवाहन कलाशिक्षक सुभाष पवार यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.