जालना :मोटारसायकल चोरट्याला केले जेरबंद

दोन दुचाकी जप्त

Jalna Nayak    01-Sep-2026
Total Views |
 
मोटारसायकल चोरीप्रकरणी कारवाई करताना जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक.
 
जालना : मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयिताला ताब्यात घेत दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची एकूण किंमत सुमारे ३० हजार रुपये आहे.
लक्ष्मण पिंटू पवार (वय २१, रा. कुंभारपिंपळगाव तांडा, ता. घनसावंगी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजवीर सिंह संधू यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांनी अधिकारी व अंमलदारांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती संकलित करून शोध सुरू केला.
दरम्यान, मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) पोलिसांना लक्ष्मण पवार याच्याकडे चोरीच्या मोटारसायकली असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुंभारपिंपळगाव परिसरात त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने दोन मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून दोन्ही मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाणे, अंबड येथे गुन्हा क्रमांक ५३१/२०२५ कलम ३०३(२) भादंवि तसेच पोलिस ठाणे परतूर येथील गुन्हा क्रमांक २६८/२०२१ कलम ३७९ भादंवि असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीला पुढील तपासासाठी अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजवीर सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि सचिन खामळ, पोउपनि राजेंद्र वाघ यांच्यासह पोलिस अंमलदारांनी केली.