जालना : एसआरपीएफ जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न

पहाटे कार्यालयातच स्वतःवर झाडली गोळी

Jalna Nayak    01-Sep-2026
Total Views |
 
धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १) पहाटे तीनच्या सुमारास घडली
 
जालना : जालना येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) ग्रुपमध्ये कार्यरत असलेल्या जवानाने स्वतःच्या सेवा शस्त्रातून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १) पहाटे तीनच्या सुमारास घडली. अजय वाकोडे असे जखमी जवानाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय वाकोडे हे जालना येथील एसआरपीएफ ग्रुपमध्ये कार्यरत आहेत. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ते कार्यालयात असताना त्यांनी आपल्या ताब्यातील सेवा शस्त्रातून स्वतःवर गोळी झाडली. अचानक झालेल्या गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.गोळीबाराचा आवाज ऐकताच सहकारी कर्मचारी तातडीने घटनास्थळी धावून गेले. त्यावेळी वाकोडे हे जखमी अवस्थेत आढळून आले. सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, वाकोडे यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. कौटुंबिक, वैयक्तिक अथवा अन्य कोणत्या कारणामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे. सेवा शस्त्रातून गोळीबार झाल्याने या घटनेची गांभीर्याने चौकशी केली जात आहे. पहाटेच्या वेळी एसआरपीएफ परिसरात घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.