जालनाः जालना जिल्ह्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी मिशन मोडवर काम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी तलाठी तसेच इतरांची तात्काळ बैठक लावून हे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप तात्काळ व्हावे तसेच इतर मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व पोलिस अधीक्षक तेगबीर संधू यांनी मंगळवारी रात्री उशिरा भेट घेऊन शासनस्तरावरून कुणबी दाखले तसेच इतर मागण्यांसाठी गतीने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. मित्तल म्हणाल्या की, मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. त्यांनी उपोषण सोडावे आपणही सर्वांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करावी असे आवाहन करावे असे जिल्हाधिकारी मित्तल यांनी उपोषणच्या मंचावरून सांगितले. जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांना दहा लाखांची मदत तसेच शासनस्तरावर असलेली इतर मदत दिली गेली आहे. अजूनही काही अडचणी असतील तर त्या तात्काळ सोडविल्या जातील असे नमूद केले.जात पडताळणी समितीकडून प्रमाणपत्रे रद्द करण्याचे काम झाले तरी आता शासनाच्या नवीन आदेशानुसार ज्यांची कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाली आहेत त्यांना विभागीय आयुक्तांकडे अपील करता येईल. यामुळे जात पडताळणी समितीचा निर्णय अंतिम नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वरिष्ठांकडून निर्णय अपेक्षित असून आम्ही सर्व माहिती मंत्री महोदयांना कळविणार असल्याचे जिल्हाधिकारी मित्तल यांनी सांगितले.
शाहाजी बापू गहिवरले
मराठा समाजासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांची प्रकृती पाहून माजी आ. शहाजी बापूंना गहिवरून आले. परिस्थिती पाहून त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सांगणार असून मराठा समाजाच्या सर्व मागण्या सकारात्मक पद्धतीने सोडविण्यासाठी मीही पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.