घनसावंगी- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक,देखाव्यात तसेच मंडपात डीजे तसेच डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करावा, आणि गावागावांत ‘एक गाव, एक गणपती’ साजरा करावा. तसेच शांततापूर्ण आणि पारंपरिक वाद्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रम ठेऊन गणेशोत्सव साजरा करावा. तसेच पोलिस पाटलांनी गावपातळीवर नागरिक, गणेश मंडळे व ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून पोलिसांशी समन्वय साधण्याचे आवाहन घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड यांनी केले.
आगामी गणेशोत्सवात घनसावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गणेशोत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा व्हावा, यासाठी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शांतता समितीतील सदस्य,पोलिस पाटील, व्यापारी यांची विशेष बैठक पोलिस ठाण्यात घेण्यात आली. बैठकीत गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत विविध महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. यावेळी बैठकीस बैठकीस शांतता समितीतील सदस्य,पोलिस पाटील, व्यापारी तसेच पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.
गणेशोत्सवाच्या काळात गावागावांत शांतता व सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी पोलीस पाटलांनी गावपातळीवर नागरिक, गणेश मंडळे तसेच ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव शक्यतो ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेतून साजरा करण्यावर पोलिसांनी विशेष भर दिला. गावातील विविध मंडळे व नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सलोखा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना करण्यात आली. एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा केल्यास अनावश्यक स्पर्धा, खर्च तसेच मंडळांमधील मतभेद टाळण्यास मदत होऊन उत्सवाला अधिक विधायक स्वरूप प्राप्त होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मिरवणूक,देखाव्यात तसेच मंडपात डीजे तसेच डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, व्यसनमुक्ती, रक्तदान, वृक्षारोपण यांसारख्या सामाजिक उपक्रमांशी जोडण्याची गरज असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात वेळोवेळी माहिती देऊन सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता त्याची सत्यता पडताळून पाहावी. पोलिस पाटील व ग्रामस्थांनी पोलिसांशी समन्वय ठेवावा, असे आवाहन करण्यात आले. गावातील गणेश मंडळांनी उत्सवाच्या काळात शिस्त, शांतता आणि सामाजिक सलोखा राखत प्रशासनाला सहकार्य करावे, असेही घनसावंगी पोलिसांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव निमित्त कोणत्याही मिरवणुकीत, देखाव्यात किंवा मंडपात डीजे व डॉल्बी लावू नये.ध्वनी प्रदूषणामुळे विद्यार्थी, रुग्ण, लहान मुले, जेष्ठ नागरिक यांना त्रास होतो, याची सर्वांनी नोंद घ्यावी. शांततापूर्ण, पारंपरिक व सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. बंदीचे उल्लंघन करणान्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-केतन राठोड
पोलीस निरीक्षक, घनसावंगी